जातपंचायतीच्या भीतीने तरुणीचेही विषप्राशन
By Admin | Updated: May 17, 2015 01:20 IST2015-05-17T01:20:01+5:302015-05-17T01:20:01+5:30
मिरजेतील घटना : तरुणाच्या आत्महत्येची चौकशी

जातपंचायतीच्या भीतीने तरुणीचेही विषप्राशन
मिरज : मिरजेत जातपंचायतीने लग्न मोडल्याने तरुणीने शनिवारी विषारी औषध प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जातपंचायतीने वाळीत टाकल्याच्या कारणावरून तरुणाच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
येथील कुंकूवाले गल्लीतील राजेंद्र गायकवाड या तरुणाने दुसरा विवाह केल्याने कुंकूवाले समाजाच्या जातपंचायतीने आक्षेप घेतला. या कारणामुळे राजेंद्रला घटस्फोट घ्यावा लागल्याने तरुणीच्या पित्याने पोलीस अधीक्षकांकडे जातपंचायती विरोधात तक्रार केली. पोलिसांत तक्रार केल्यामुळे गायकवाड कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आल्याने राजेंद्रचा मोठा भाऊ लक्ष्मण गायकवाड याने शुक्रवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी लक्ष्मणच्या आत्महत्येस जबाबदार ठरवून तरुणीच्या भावास मारहाण करण्यात आली. लक्ष्मणच्या मृत्युमुळे व जातपंचायतीच्या भीतीने घटस्फोटित तरुणीनेही शनिवारी सकाळी विष प्राशन केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रकृती गंभीर बनल्याने संबंधित तरुणीला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तक्रारीनंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येच्या प्रकरणानंतर संबंधित कुटुंबाने पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी मोठा दबाव आणण्यात येत असून, प्रकरण मिटविण्यासाठी धावपळ सुरू असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)