अवकाळीने बेदाणा उत्पादक देशोधडीला...
By Admin | Updated: March 2, 2015 00:02 IST2015-03-01T23:36:11+5:302015-03-02T00:02:37+5:30
उत्पादकांना झटका : रॅकवरील जाळ्यांमध्ये पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा काळा पडण्याची चिन्हे

अवकाळीने बेदाणा उत्पादक देशोधडीला...
प्रवीण जगताप - लिंगनूर -आज पहाटेपासून जिल्ह्यातील मिरज पूर्व, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या परिसराला मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. रॅकवरील जाळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा भिजला आहे. तसेच द्राक्षबागांतील बेदाणा निर्मितीच्या हेतूने तयार असलेली द्राक्षेही या अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याने, बेदाणा रॅकवरील बेदाणे अन् रॅकवर जाणारी द्राक्षेही खराब होणार आहेत.
बेदाणा निर्मिती सुरू असलेल्या व शेडवर येऊन पडलेल्या द्राक्षांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते अडीच लाखाचे नुकसान प्रत्येक बेदाणा उत्पादकाचे झाले आहे. हजारो टन बेदाण्याचे व निर्मितीक्षम द्राक्षांचे नुकसान झाले असून, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व तासगाव परिसरातील बेदाणा शेडवरील नुकसानीचा अंदाज करणेही मुश्कील होऊन बसले आहे.
मिरज पूर्व भागात सध्या २५ टक्के द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी तयार आहेत, तर २५ टक्के द्राक्षांची रॅकवर बेदाणा निर्मिती सुरू आहे. २१ दिवसात द्राक्षापासून बेदाणे तयार होत असल्याने, मागील २१ दिवसांपासून आजअखेर विविध टप्प्यात असलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, बेळंकी, डोंगरवाडी, संतोषवाडी, सलगरे, जानराववाडी, आरग, सीमावर्ती गावे, डोंगरवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, बनेवाडी परिसर तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तर भागातील माळरानावर उभारलेल्या हजारो बेदाणा शेडवरही बेदाणा निर्मिती प्रक्रिया वेगात सुरू आहे. पण कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, नागज, आगळगाव, शेळकेवाडी, चोरोची, घोरपडी, जुनोनी या भागातही मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ, इतकेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, शेडशाळ, आलास या गावांतील द्राक्षेही पूरक वातावरणामुळे बेदाणा निर्मितीसाठी वाहनांतून येथे पोहोचविली आहेत. त्यांची बेदाणा निर्मितीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण मुसळधार, संततधार पावसाच्या सरींमुळे हजारो टन बेदाणा पावसात भिजून खराब झाला आहे. तसेच हा बेदाणा १०० टक्के काळा पडणार आहे.
गाऱ्हाणे
बेदाण्याचे
बेदाणा व निर्मितीक्षम रॅकवरील द्राक्षे संपूर्ण भिजल्याने पूर्ण बेदाणा काळा पडणार आहे. काळा पडलेला बेदाणा कवडीमोल दराने विकला जातो. गतवर्षी २०० ते ३०० रूपये इतका चांगला दर मिळाला होता, तर यंदाही १५० ते १७० रूपये इतका दराचा आकडा सुरू असताना, आता काळा पडलेला बेदाणा चार नंबरचा म्हणून त्याला ३० रूपये किलोचाही भाव मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते तीन लाख रूपयांचे आर्थिक नुकसान आता बेदाणा उत्पादकाला सोसावे लागणार आहे.
ज्या बेदाणा उत्पादकांचा तयार बेदाणा काल, शनिवारअखेर कोल्ड स्टोअरेजपर्यंत पोहोचला आहे, त्यांचाच बेदाणा आज अचानक पहाटेपासून झालेल्या पावसापासून नशिबाने वाचला आहे. बाकी सर्व बेदाणा अन् द्राक्षांचा सुपडा साफ होणार आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या बेदाणा निर्मितीस व बेदाण्यासाठी पिकविलेल्या द्राक्षांना फटका बसला आहे. एकरी दोन ते अडीच लाखाचा फटका बसला आहे. माझा १५ टन माल खटावच्या रॅकवर आहे, तर सुमारे १५ टन द्राक्षे अद्याप बागांमध्ये आहेत. माझ्याप्रमाणेच येथील सर्व बेदाणा उत्पादक देशोधडीला लागले आहेत. मागील दोन वर्षात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपेक्षा हे नुकसान जास्त आहे.
- बाळासाहेब व्हणाणावर,
बेदाणा उत्पादक, खटाव (ता. मिरज)