‘स्फोटा’मुळे विटेकरांचा जीव टांगणीला...
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:32:52+5:302014-12-02T00:19:05+5:30
नियमांची पायमल्ली : प्रशासनाची पकड सैल, भाळवणीपाठोपाठ विट्यातही प्रश्न गंभीर

‘स्फोटा’मुळे विटेकरांचा जीव टांगणीला...
दिलीप मोहिते - विटा -सांगली जिल्ह्यातील सुवर्णनगरी विटा शहरात नागरी वस्तीत होत असलेल्या फटाक्यांच्या व स्फोटक पदार्थांच्या अनधिकृत साठ्यामुळे विटेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. शोभेची दारू निर्मितीसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या भाळवणी गावापाठोपाठ आता विटा शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
स्फोटक पदार्थांचा किती साठा असावा व तो कोठे करावा, याबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचीच पायमल्ली साठेबाजांकडून होत आहे. परवाने दिल्यानंतर नियमांची अंमलबजावणी कशी होते, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरी वस्तीतच बेसुमार फटाक्यांचा साठा होत असल्याचे दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्रात खानापूर तालुक्यातील भाळवणी हे शोभेची दारू निर्मिती करणारे प्रसिध्द गाव आहे. गेल्या अनेक वर्षांची दारू निर्मितीची परंपरा भाळवणी गावाने जपली असली तरी, सुरक्षिततेच्यादृष्टीने कारखानदारांकडून फारशा उपाययोजना हाती घेतल्या जात नसल्याचे दिसते.
दोन दिवसांपूर्वी विटा येथील बाबालाल फायर वर्क्स येथे स्फोट झाला. भरवस्तीत फटाक्यांच्या गोदामामध्ये झालेल्या या स्फोटात तिघेजण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर गोदामाला आग लागली त्यावेळी शेकडो युवकांनी सुमारे दोन ट्रक फटाक्यांचा माल बाहेर काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, विटा शहरात फटाक्यांच्या साठ्याची गोदामे भरवस्तीत अनेक ठिकाणी आजही आहेत. मायणी रोड, गणेश पेठ, तासगाव रस्ता, शिवाजी चौक, उभी पेठ यासह अन्य ठिकाणी आजही भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने सुरू आहेत. प्रशासनाने भरवस्तीत फटाक्यांची गोदामे व विक्रीच्या दुकानात किती साठा करावा, फटाक्यांच्या साठ्यांची गोदामे कुठे असावीत याबाबत घालून दिलेल्या नियमांची कारखानदारांकडून पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. फटाका परवानाधारकांची फटाके गोदामे कुठे आहेत व त्या गोदामात किती माल ठेवला आहे, याची तपासणी करण्याचे काम प्रशासन व पोलिसांकडून गांभीर्याने होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे भाळवणी गावापाठोपाठच विटा शहरातील भरवस्तीत असणारे फटाके निर्मिती कारखाने व स्फोटक फटाक्यांची गोदामे नागरिकांच्या जिवाशी खेळ करू लागली आहेत. विटा येथे फटाक्यांचा अनधिकृत मोठा साठा केल्याचा आरोप ठेवत विटा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
प्रशासकीय आदेशाला ठेंगा
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून शहरात फटाक्यांचे अनधिकृत मोठे साठे होत असतील, तर त्यांची तपासणी करण्याचे सोपस्कार पोलिसांनी स्फोटापूर्वी का केले नाहीत? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. शोभेच्या दारूची निर्मिती करणारे कारखाने नागरी वस्तीतून सुमारे ४ ते ५ कि.मी. अंतरावर असावेत, यासह शासनाने घालून दिलेल्या अन्य पर्यायी अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अभय मिळत आहे.
फटाके निर्मिती व विक्रीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जातात. त्याची तपासणी करण्याचे काम पालिका क्षेत्रात नगरपरिषदेचे असते. यापूर्वी भाळवणी येथे शोभेच्या दारू कारखान्यात दुर्घटना घडली होती. त्यावेळी नागरी वस्तीतून कारखाने बाहेर नेण्याबाबत व्यावसायिकांना आदेश दिले होते. विटा शहर व ग्रामीण भागात अजूनही फटाके निर्मितीचे कारखाने नागरी वस्तीत असतील व पोलिसांचा अहवाल आल्यास ते कारखाने महसूल विभाग तातडीने व सक्तीने गावाबाहेर काढणार आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- सचिन इथापे, प्रांताधिकारी, विटा
तालुक्यात अशा घडल्या स्फोटांच्या घटना
२००० ते २००३ च्या सुमारास भाळवणीत शोभेच्या दारूच्या कारखान्यातील स्फोटात सय्यद मुल्ला व कामगार निजाम गवंडी या दोघांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते.
दि. ८ नोव्हेंबर २००५ ला बिरोबा फायर वर्क्स या प्रल्हाद कुंभार यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात श्रीकांत दिवे (मामा) या कामगाराचा जीव गेला.
३ सप्टेंबर २०१४ ला याच कारखान्यात पुन्हा स्फोट झाला. परंतु, कारखाना बंद असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. पण एक लाख रूपयांचे नुकसान झाले.
दोन दिवसांपूर्वी विटा येथील बाबालाल फायर वर्क्स येथे स्फोट झाला. या स्फोटात तिघेजण जखमी झाले असून, वाहनेही जळाली आहेत.
विटा शहरात भरवस्तीत अनेक ठिकाणी फटाक्यांचे मोठे साठे आहेत. शनिवारच्या स्फोटात हा साठा बाहेर काढल्याने आसपासच्या शेकडो लोकांचे जीव वाचले. या गंभीर घटनेचा विचार करून प्रशासनाने गावाच्या भरवस्तीत असणारे फटाक्यांचे कारखाने व दुकाने गावाबाहेर न्यावीत. त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करून अहवाल मागवावा. कायदा व नियमांची पायमल्ली करून कोणी कारखानदार निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळ करीत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
- जे. के. (बापू) कांबळे,
प्रदेश उपाध्यक्ष, दलित महासंघ, विटा