दुष्काळाचे सावट अन् इस्लामपुरात राजकारण्यांची दिवाळी!

By Admin | Updated: September 6, 2015 22:59 IST2015-09-06T22:59:25+5:302015-09-06T22:59:25+5:30

नागरिकांतून नाराजी : वारणा-कृष्णा खोऱ्यातही पाणी टंचाईचे संकट; परिस्थिती गंभीर बनली असताना कार्यक्रमांची गर्दी

Due to drought and political Islamists diwali in Islampura! | दुष्काळाचे सावट अन् इस्लामपुरात राजकारण्यांची दिवाळी!

दुष्काळाचे सावट अन् इस्लामपुरात राजकारण्यांची दिवाळी!

अशोक पाटील -इस्लामपूर  चांगल्या पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या भागावरही दुष्काळाची गडद छाया दाटली आहे. कोकणासह वारणा, पंचगंगा आणि कृष्णा खोऱ्यातही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या गौरी—गणपती सणावरही दुष्काळाचे सावट असून, बाजारपेठा ओस पडल्या आहेत. तरीही इस्लामपूर शहरातील काही नेत्यांनी दहीहंडी, वाढदिवस आणि वाय—फाय सेवेवर लाखो रुपये खर्च करून दिवाळी साजरी केली आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच वाळवा तालुक्याचे नेते जयंत पाटील यांनीही दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादीने वाया जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. असे असेतानाही इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादीने नगरपालिकेच्या माध्यमातून मोफतच्या नावाखाली महागडी वाय—फाय सेवा सुरु करुन त्याच्या उद्घाटनासाठी सिनेतारका सई ताम्हणकर यांना आमंत्रित करुन युवक वर्गाला आकर्षित करण्याचा डाव आखला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दहीहंडी भरविण्याचा गाजावाजा करणाऱ्या महाडिक युवा शक्तीने यावर्षीही मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे नियोजन केले आहे. या युवाशक्तीला आव्हान देण्यासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांनी दहीहंडी सुरु केली होती. परंतु त्यांनी दुष्काळाचे सावट पाहून यावर्षीची दहीहंडी रद्द करुन योग्य निर्णय घेतला आहे. मात्र महाडीक युवा शक्तीने सिने तारकांना आमंत्रित करुन दहीहंडीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. याबाबत सम्राट महाडीक यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही दहीहंडीबरोबर दुष्काळग्रस्त भागालाही मदत करु, असे आश्वासन देत आपण बरोबरच असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे हे दुष्काळग्रस्तांचा दौरा करणार आहेत. परंतु सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करुन शहरातील प्रत्येक चौकात डिजिटल पोस्टर झळकवून पैशाचा चुराडा केला आहे.
शिराळा, वाळवा तालुक्यातील पावसाने यावर्षी दडी मारली आहे. शिराळा तालुक्यात भाताची लागण वाया गेली आहे. तर ऐन दिवाळीत पैसा देणारे सोयाबीन जळून खाक झाले आहे. अशीच परिस्थिती वाळवा तालुक्यात आहे. याचा परिणाम आगामी सर्वच सण, उत्सवांवर होणार आहे. असे असतानाही शहरातील नेत्यांनी मात्र आतापासूनच दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नेत्यांच्या या कृतीबद्दल सर्वसामान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


नगरपरिषदेने ‘वाय—फाय’च्या उद्घाटनासाठी सिनेतारका सई ताम्हणकरला बोलावणे म्हणजे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कॅब्रे डान्स ठेवण्यासारखे आहे. महाडिक युवा शक्तीने स्वखर्चाने दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे; तर आनंदराव पवार वाढदिवस करण्यास इच्छुक नव्हते, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला, हे योग्य नाही. आगामी काळात सर्वच पक्षांनी दुष्काळाचा विचार करुन काटकसर करणे गरजेचे आहे.
-विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.

‘वाय-फाय’चा गैरवापर
इस्लामपूर पालिकेने एका कंपनीच्या माध्यमातून शहरात तात्पुरती मोफत वाय—फाय सेवा सुरु केली आहे. काही महिन्यांनंतर या सेवेला पैसे मोजावे लागणार आहेत. ज्याठिकाणी ही सेवा आहे, त्याठिकाणी महाविद्यालयीन युवकांची गर्दी असते. यातील ९0 टक्के युवक अश्लील चित्रफिती डाऊनलोड करुन घेण्यातच व्यस्त दिसतात. याचे भविष्यात वाईट परिणाम होऊन पालकांची डोकेदुखी वाढू शकते.

Web Title: Due to drought and political Islamists diwali in Islampura!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.