डेंग्यूच्या साथीवरून आरोग्य विभाग धारेवर
By Admin | Updated: May 23, 2016 00:21 IST2016-05-22T22:44:19+5:302016-05-23T00:21:07+5:30
जयंत पाटील यांच्याकडून कानउघाडणी : मौजे डिग्रजमध्ये बैठक

डेंग्यूच्या साथीवरून आरोग्य विभाग धारेवर
कसबे डिग्रज : आपणा सर्वांना डेंग्यूच्या साथीचा मोठा त्रास झाला आहे. ही साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडले. केवळ आकडेवारी जमा करण्यापेक्षा आरोग्य विभागाने घरोघरी पोहोचून साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करावेत, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी मौजे डिग्रज येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले.
मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आ. पाटील यांनी रविवारी सकाळी बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, बांधकाम सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, सरपंच छायाताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार पाटील यांनी गावात डेंग्यूचे किती रूग्ण आहेत, अशी विचारणा केली. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४८ रूग्ण असल्याची माहिती दिली. याला आक्षेप घेत ग्रामस्थांनी गावात सातशे ते आठशेजणांना डेंग्यूसदृश लक्षणे असल्याचे सांगितले. यावेळी गोंधळ सुरू झाला. यावर जयंत पाटील यांनी घरोघरी सर्वेक्षण करून साथ आटोक्यात आणण्याचे आदेश दिले.
भालचंद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाऊसाहेब मगदूम, आनंदा पाटील, सुखदेव साळुंखे, शशिकांत सावंत, पंडित पाटील, शशिकांत नांदणीकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बी. के. दळवी, सहायक संचालक डॉ. महेश खलिते, डॉ. संगीता देशमुख, डॉ. सुहास शिंदे, डॉ. नरेंद्र पवार, डॉ. मनीषा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रश्नांचा भडीमार : अधिकारी हतबल
ाजल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी, आरोग्य विभागाने केलेल्या कामाचा आढावा मांडला. यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करुन, आपणाकडून पावडर मिळाली का? आपण किती रुग्णांना मदत केली? अशी विचारणा केली. यामुळे अधिकारी हतबल झाले होते.