संततधार पावसाने सांगलीत दैना

By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:07:26+5:302014-08-31T00:14:04+5:30

जिल्ह्यातही हजेरी : सहा दिवस जनजीवन विस्कळीत

Due to the continuous rain, | संततधार पावसाने सांगलीत दैना

संततधार पावसाने सांगलीत दैना

सांगली : गेल्या सहा दिवसांपासून सांगली, मिरजेत संततधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसाने शहर परिसरात मात्र दैना उडाली आहे. गेल्या सहा दिवसांत केवळ आज (शनिवारी) दुपारी तीननंतर सूर्यदर्शन झाले.
आज (शनिवार) सकाळी साडेअकरा ते दुपारी दोनपर्यंत संततधार होती. काहीकाळ जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नागरिकांनीही भर पावसातच व्यवहार सुरू ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालय ते न्यायालय आवारात गुडघाभर पाणी साचले होते. त्याचबरोबर जुना स्टेशन रस्ता, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, शासकीय रुग्णालय रस्ता, तरुण भारत स्टेडियम परिसर आदी ठिकाणीही गुडघाभर पाणी साचून राहिले होते. दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती.
गेले सहा दिवस संततधार सुरू राहिल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भिजत जाणे भाग पडले. पावसाने बाजारपेठेत तर दैना उडाली. गणेशोत्सवानिमित्त सजावटीचे साहित्य विकणाऱ्यांना भर पावसातच व्यवसाय करावा लागत आहे. साहित्य भिजून खराब होत आहे. सर्वाधिक फटका रस्त्यावरील स्टॉलधारकांना बसला आहे. दत्त-मारुती रस्त्यावरील विक्रेत्यांना पाण्यात उभे राहूनच व्यवसाय करावा लागत आहे. शाळा महाविद्यालयांसमोरील क्रीडांगणांमध्ये आजही पाणी साचून राहिले होते. तरुण भारत स्टेडियम, छत्रपती शिवाजी स्टेडियम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमला तळ्याचे स्वरूप आले होते.
शामरावनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, वानलेसवाडी, संजयनगर, अभयनगर, हनुमाननगर आदी उपनगरांमध्ये पावसाने दैना उडवली आहे. सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहिले आहे. तेथील नागरिकांना घरी जाण्यासाठी नवीन वाट शोधावी लागत आहे.
गेल्या सहा दिवसांच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली आहे. कवठेमहांकाळ, आटपाडी, जत आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the continuous rain,