मिरज पूर्व भागात थंडीमुळे आंब्याच्या मोहोराला नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:16+5:302021-02-07T04:24:16+5:30
लिंगनूर : मिरज पूर्व भागात सध्या आंब्याला पोषक वातावरण तयार झाले असून, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन वाढणार ...

मिरज पूर्व भागात थंडीमुळे आंब्याच्या मोहोराला नवसंजीवनी
लिंगनूर : मिरज पूर्व भागात सध्या आंब्याला पोषक वातावरण तयार झाले असून, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन वाढणार आहे. यामुळे आंबा उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मिरज पूर्व भागातील अनेक शेतकरी आजवर खरीप व रब्बी हंगामाबरोबर भाजीपाला पीक घेत. मात्र, सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे येथील समीकरण बदलून शेतकरी बागायती व फळ लागवडीकडे वळला आहे. गेल्या काही वर्षात मिरज पूर्व भागात द्राक्ष पिकाबरोबर आंबा शेतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे ऐन बहरात आलेला आंब्याचा मोहोर काळा पडून गळायला सुरुवात झाली होती. ढगाळ वातावरणामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान सोसावे लागले होते. मात्र, यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आंब्याला डिसेंबर, जानेवारीत मोहोर फुटतो. त्याला पोषक अशा थंडीचे वातावरण लाभल्यास आंबा भरगच्च लागतो. सद्यस्थितीत गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याने आंबा मोहरासाठी पोषक वातावरण असून, झाडांच्या परिसरात विशिष्ट सुगंध दरवळत आहे. मोहोराभोवती फिरणाऱ्या मधमाशांमुळे मनमोहक रूप नजरेला पडत आहे.
प्रतिक्रिया :
आंबा व्यवस्थापनात मोहाेर येण्याचा टप्पा महत्त्वाचा असतो.
यावर्षी आंबा बागांची मोहोरस्थिती चांगली असल्याने उच्च प्रतीचे निर्यातक्षम
आंबा उत्पादन अपेक्षित आहे.
- संभाजी गायकवाड.
आंबा उत्पादक (बेळंकी)
फोटो : ०६ लिंगनुर १
ओळ : मिरज पूर्व भागातील आंबा झाडावर मोहर फुलला आहे.