बंद कारखान्यांमुळे गूळ आवक वाढली

By Admin | Updated: October 26, 2014 23:27 IST2014-10-26T22:11:10+5:302014-10-26T23:27:50+5:30

सौद्यांना प्रारंभ : दरामुळे उत्पादकांना दिलासा; कर्नाटकातून आवक

Due to closed factories, jaggery arrivals increased | बंद कारखान्यांमुळे गूळ आवक वाढली

बंद कारखान्यांमुळे गूळ आवक वाढली

सांगली : येथील मार्केट यार्डमध्ये गुळाची आवक वाढली असून, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारी गुळाच्या सौद्यांना प्रारंभ झाला. उसाला कारखान्यांकडून दर मिळाला नसल्यामुळे व अनेक कारखाने बंद राहिल्यामुळे यावर्षी गूळ उत्पादनाकडे कल वाढला आहे. सांगलीत यावर्षी वीस टक्के गुळाची आवकही वाढली आहे.
गेल्या सहा महिन्यांत सांगलीमध्ये तीस किलोच्या २२ लाख रव्याची, तर दहा किलोच्या ४८ लाख रव्यांची आवक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे वीस टक्के गुळाची आवक वाढली आहे. सांगलीमध्ये कर्नाटकातील बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यातून गुळाची आवक होत असते. सांगलीतून स्थानिकबरोबरच राजस्थान, गुजराथ या राज्यात गूळ पाठवला जातो. गेल्या वर्षापासून आंध्रप्रदेश ही सांगलीतील गूळ व्यापाऱ्यांसाठी नवी बाजारपेठ झाली आहे.
उसाला मिळणारा अस्थिर दर त्याचबरोबर अनेक कारखाने बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा गूळ उत्पादनाकडे कल वाढला आहे. गूळ उत्पादकांना तात्काळ दराचे पैसे मिळत असल्यामुळे उसापेक्षा गूळ उत्पादनाकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर गुळावर अद्याप कोणताही कर लावण्यात आलेला नाही. सांगलीतील बाजारपेठेत सौद्यांच्या तिसऱ्यादिवशी शेतकऱ्यांच्या हातात गुळाचे पैसे मिळत आहेत. त्याचबरोबर सांगलीतील बाजारपेठ यावेळी अखंड सुरु राहिल्यामुळेही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत सुमारे सात लाख क्विंटल गुळाची आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये गुळाला २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. यावर्षी मिळालेल्या दर हा दहा टक्के अधिक आहे. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष नितीन पाटील, बाजार समितीचे सचिव पी. एम. पाटील, शरद शहा, अभय मगदूम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यावर्षी गुळाची सुमारे वीस टक्के आवक वाढली आहे. दरही दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गूळ उत्पादकांबरोबर गूळ व्यापाऱ्यांनाही दिलासा देणारे चित्र आहे. साखर कारखान्यांच्या समस्यांमुळेही गूळ उत्पादनाकडे कल वाढला आहे. देशभरातून गुळाला मागणीही वाढली आहे.
- शरद शहा, अध्यक्ष,
गूळ व्यापारी असोसिएशन, सांगली.

Web Title: Due to closed factories, jaggery arrivals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.