जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे मिरजेत आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: September 17, 2015 00:51 IST2015-09-17T00:48:59+5:302015-09-17T00:51:11+5:30
तरुणाचे विषप्राशन : सहा महिन्यांत तिसरा प्रकार

जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे मिरजेत आत्महत्येचा प्रयत्न
मिरज : मिरजेत पोलिसांत तक्रार केल्याबद्दल जातपंचायतीने वाळीत टाकल्याने नितीन नामदेव मोरे (वय ३०, रा. मंगळवार पेठ) या तरुणाने बुधवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नितीन मोरे यास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी राजेंद्र गायकवाड या तरुणाने नात्यातील तरुणीशी दुसरा विवाह केल्याने कुंकूवाले समाजाच्या जातपंचायतीने आक्षेप घेऊन राजेंद्र यास घटस्फोट घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी घटस्फोटित तरुणीचे वडील नामदेव मोरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे जातपंचायतीविरोधात तक्रार केली होती. पोलिसांत तक्रार केल्यामुळे तरुणीच्या भावास मारहाण करून दोन्ही कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आले. यामुळे राजेंद्रचा मोठा भाऊ लक्ष्मण गायकवाड याने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
लक्ष्मणच्या मृत्यूनंतर जातपंचायतीच्या भीतीने घटस्फोटित तरुणीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याप्रकरणी सुरेश चंदनवाले, किरण गायकवाड, व्यंकटेश भोसले, अण्णाप्पा चंदनवाले, पोपट मोरे यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी कुंकूवाले समाजात जातपंचायत अस्तित्वातच नसल्याचा पवित्रा घेऊन कुटुंबाला वाळीत टाकल्याचे नाकारले.
दरम्यान, संबंधित कुटुंबाने पोलिसातील तक्रार मागे घ्यावी, यासाठी दबाव आणून मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी देण्याचे आश्वासन देऊन प्रकरण मिटविण्यात आले होते. मोरे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. जातपंचायतीमुळे सहा महिन्यांत दोन्ही कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी नाकारली
जातपंचायतीने पुन्हा मोरे कुटुंबियांना मुलीच्या दुसऱ्या विवाहास परवानगी देण्यास नकार देऊन पोलिसात गेल्याबद्दल समाजाची माफी मागण्यास भाग पाडले. यामुळे या तरुणीचा भाऊ नितीन नामदेव मोरे याने बुधवारी सकाळी घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.