आंदोलनामुळे नदीकाठावरील गावांचे पाणी बंद
By Admin | Updated: January 17, 2016 00:35 IST2016-01-17T00:12:08+5:302016-01-17T00:35:46+5:30
चांदोलीत धरणग्रस्तांचा ठिय्या : शिराळा पश्चिम, शाहूवाडी उत्तरमध्ये टंचाई

आंदोलनामुळे नदीकाठावरील गावांचे पाणी बंद
वारणावती : चांदोली (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील धरणग्रस्तांनी धरणातून बाहेर पडणारे पाणी दि. ११ जानेवारीपासून बंद करण्यास भाग पाडले आहे. धरणातून वारणा नदी येणारे पाणी बंद झाल्याने वारणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील पिण्याचे पाणी व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी उघड्यावर पडल्या आहेत. यामुळे बहुतांशी गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
विविध मागण्यांसाठी वारणा धरण व प्रकल्पग्रस्तांचे चांदोली धरण परिसरात गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. पुनर्वसनाबाबत मर्यादित अधिकार असणारे अधिकारी व तहसीलदार व आंदोलकांशी चर्चेला येतात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धरणग्रस्तांनी चांदोलीचे बाहेर पडणारे पाणी बंद पाडले आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील व शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील नदीकाठावरील बहुतांशी गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने अनेक गावातून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. सरकारने लवकर धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करुन आंदोलन संपवावे व पूर्ववत पाणीपुरवठा सुरु व्हावा, अशी मागणी गावागावातून होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्हीही आंदोलनात उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
सोमवारी बैठक
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर व सांगलीच्या वन, महसूल व पाटबंधारे अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे गौरव नायकवडी यांनी स्पष्ट केले.