दुबईतील कंपनीचा मिरजेतील द्राक्ष व्यापाऱ्यास पावणेतीन कोटीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:50+5:302021-06-02T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ या कंपनीने तीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे मागवून ...

दुबईतील कंपनीचा मिरजेतील द्राक्ष व्यापाऱ्यास पावणेतीन कोटीचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ या कंपनीने तीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे मागवून मिरजेतील व्यापाऱ्यास दोन कोटी ८० लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दुबईतील कंपनीस द्राक्षे पाठविणारे जिल्ह्यातील शेतकरी या प्रकाराने हवालदिल झाले आहेत.
मिरजेतील पांडुरंग जगताप यांची कृषिमाल निर्यात करणारी ऑल एशिया इम्पोर्ट ॲन्ड एक्सपोर्ट या नावाची व्यापारी फर्म आहे. या फर्मच्या माध्यामातून जगताप गेली काही वर्षे फळे, भाजीपाला व ड्रायफ्रूटस परदेशात निर्यात करतात. त्यांच्या व्यवसायाची गुगलवर, वेबसाईटवर दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ ट्रेडिंग या कंपनीतून जगताप यांच्याशी संपर्क साधून द्राक्षे खरेदीबाबत डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या महिन्यात बोलणी झाली. या कंपनीमार्फत जगताप यांना ई-मेल करून द्राक्ष खरेदीची ऑर्डर देण्यात आली. त्यानुसार जगताप यांनी सांगली जिल्ह्यातील सावळज, नागठाणे, जत, बिळूर येथील शेतकऱ्यांचा निर्यात दर्जाची द्राक्षे जहाजाने दुबईला पाठविली.
जान जबेल कंपनीचे व्यवस्थापक सुबिध व आनंद देसाई यांनी बिल स्कॅन काॅपीच्या आधारे ३० टक्के रक्कम व उरलेली ७० टक्के रक्कम देणार असल्याचे सांगितले होते. सुबिध व आनंद देसाई यांनी द्राक्षाचे तीन कंटेनर दुबईत पोहोचल्यानंतर तीन टप्प्यात २५ लाख रुपये मार्च महिन्यात पाठविले. ही रक्कम मिळेपर्यंत आणखी १२ कंटेनर जगताप यांच्याकडून घेतले. त्यांनतर जगताप यांनी राहिलेल्या रकमेची मागणी केली असता सुबिध व आनंद देसाई यांनी मार्च महिनाअखेरीस रक्कम देतो असे सांगितले. जगताप यांनी पाठविलेली १५ कंटेनरचे तीन कोटी पाच लाख बिलापैकी दोन कोटी ८० लाख बाकी अद्याप येणे आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असल्याने सुबिध व आनंद देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत ११ एप्रिलपासून त्यांचे फोन बंद केले. दुबईतील जानजबेल अल नजर फूडस्टफ कंपनीचे सुबिध व आनंद देसाई यांनी विश्वास संपादन करून दोन कोटी ८० लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद पांडुरंग जगताप यांनी गांधी चाैक पोलिसात दिली आहे.
चाैकट
बोगस धनादेशाद्वारे अनेकांना गंडा
दुबईतील जान जबेल कंपनीने कृषीमाल आयात करून ४० कोटींचे बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याबद्दल महिनाभरापूर्वी मुंबईतही गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीतून संपर्क साधणारे भारतीय नागरिक असून, त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.