कृष्णा-वारणा काठचा वाळवा तालुका सावरू लागलाय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:25+5:302021-08-15T04:27:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा-वारणा नदीला आलेल्या महापुरानंतर नदीकाठची ३९ गावे हळूहळू सावरू लागली आहेत. शासनाची ...

कृष्णा-वारणा काठचा वाळवा तालुका सावरू लागलाय...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा-वारणा नदीला आलेल्या महापुरानंतर नदीकाठची ३९ गावे हळूहळू सावरू लागली आहेत. शासनाची मदत अद्याप मिळाली नसली तरी सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून पूरग्रस्त जगण्याची आस टिकवून आहेत. स्वच्छता, पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करून घेण्यात पूरग्रस्त व्यस्त आहेत. नदीकाठच्या गावातून शेतीचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर घरे, दुकाने, टपऱ्या, गोठे, यंत्र सामग्रीचे १५ कोटी नुकसानीचा अंदाज आहे. सर्व प्रकारच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.
तालुक्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठी एकूण ३९ गावे वसलेली आहेत. या सर्व गावांना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. महापुरात लहान-मोठी ५६ जनावरे दगावली, तर २० हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. १२२२ गोठयांचे नुकसान झाले. ११९ पक्की घरे आणि १४५ कच्च्या घरांची पूर्ण पडझड झाली. ७४८ दुकानांमध्ये आणि ९७ छोट्या टपऱ्या पाण्यात गेल्या होत्या. बाराबलुतेदारांच्या ८४ यंत्र सामग्रीचे नुकसान झाले. कच्चा आणि तयार मालाचे १९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाळवा तालुक्यात शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण मसुद्याच्या निकषानुसार सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये उसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ४३ हजार शेतकऱ्यांचे १४ हजार ३१४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात ११ हजार ७४६ हेक्टरमधील ऊस पिकाचा समावेश आहे. १५२९ हेक्टर सोयाबीन, ३९२ हेक्टर भुईमूग, ३३० हेक्टर द्राक्षे, ८७ हेक्टरवरील भाजीपाला आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
पुराचा फटका जिल्हा आणि ग्रामीण भागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बहे पुलाची पडझड झाली. रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २ कोटी ८६ लाख, तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी १४ कोटी २३ लाख रुपयांचा प्रस्ताव पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने दिला आहे. पुरामुळे तालुक्यात नुकसान झाले असले तरी आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
कोट
पुरामुळे घरे पाण्यात गेलेल्या कुटुंबांची संख्या ५ हजार १८३ इतकी असून त्यांच्यासाठी ५ कोटी १८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. बुधवारी हे अनुदान प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा होईल. शेती आणि इतर नुकसानीसाठी जसे अनुदान प्राप्त होईल तसे ते खात्यावर वर्ग करणार आहे.
- रवींद्र सबनीस
तहसीलदार, इस्लामपूर.