उपमहापौरांकडून स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

By Admin | Updated: May 25, 2016 00:20 IST2016-05-24T23:50:32+5:302016-05-25T00:20:41+5:30

महापालिकेत बैठक : आरोग्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती

Dry cleaning supervisor's plantation by Deputy Mayor | उपमहापौरांकडून स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

उपमहापौरांकडून स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती

सांगली : कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी उपमहापौर विजय घाडगे यांनी स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेत, आरोग्य विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत कृती आराखडा तयार करण्याचे आदेश घाडगे यांनी दिले आहेत.
सरस्वतीनगर येथे नुकताच कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगळवारी उपमहापौर विजय घाडगे, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, नगरसेवक बाळू गोंधळी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे गैरहजर होते. बैठकीत स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेण्यात आली.
बालिकेच्या मृत्यूनंतर कुत्री पकडण्याच्या मोहिमेचाही उपमहापौरांनी आढावा घेतला. गेल्या दोन दिवसात केवळ २२ कुत्री पकडण्यात आल्याचे स्वच्छता निरीक्षकांनी स्पष्ट केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. स्वच्छता निरीक्षकांना नागरिकांच्या सुरक्षिततेचे भान राहिलेले नाही. घरात बसून स्वच्छतेचे नियोजन सुरू आहे. रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणात पडला आहे. मोकाट कुत्र्यांची नागरिकांत दहशत आहे. तरीही त्याचे गांभीर्य स्वच्छता निरीक्षकांना नाही, अशा शब्दात त्यांनी फटकारले.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोमवारपर्यंत आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करण्याची सूचना करीत ते म्हणाले की, कुत्री पकडण्यासाठी केवळ सहा कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली पाहिजे. त्यासाठी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉग व्हॅनवर घ्यावे. सकाळच्या टप्प्यात स्वच्छतेचे काम आणि दुपारनंतर कुत्री पकडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आदेश दिले. कुत्री पकडण्यासाठी पालिकेकडे जाळ्याही नाहीत. अपुरी साधने आहेत, अशी तक्रारही स्वच्छता निरीक्षकांनी केली.
आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांना साफसफाईच्या कामात फारसा रस नाही. विविध परवाने देण्यासाठी निरीक्षक जितकी तत्परता दाखवितात, तितकी तत्परता स्वच्छतेच्या कामात दाखविली तरी शहरातील अनेक समस्या सुटू शकतील. यापुढील काळात नाहरकतचे परवाने देण्याचा उद्योग स्वच्छता निरीक्षकांनी बंद करावा, असे आदेशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Dry cleaning supervisor's plantation by Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.