घनशाम नवाथेसांगली : गांजा आणि एमडी ड्रग्जमुळे अधोरेखित झालेल्या सांगली जिल्ह्यातील नशेखोरीचा बाजार अद्यापही कायम आहे. विटा येथे मेफेटर्माइनची खरेदी-विक्री करणारी टोळी पकडल्यामुळे पुन्हा एकदा अमली पदार्थाची तस्करी समोर आली आहे. काही शरीरसौष्ठवपटूंकडून याचा वापर केला जातो. परंतु, हे नशा आणणारे इंजेक्शन जीवनाची दुर्दशा करू शकते. त्यामुळे नशेच्या इंजेक्शनची तस्करी, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा कडक डोस आवश्यक बनला आहे.विटा येथे गतवर्षी जुलै २०२४ मध्ये नशेच्या इंजेक्शनप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश ते मिरज असे नशेच्या इंजेक्शनचे कनेक्शन उघडकीस आले होते. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करीत १३ जणांवर कारवाई केली होती. सुमारे १५ लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त करून थेट उत्तर प्रदेशात जाऊन पाळेमुळे खणली होती.कोल्हापूर येथे काही दिवसांपूर्वी व्यायामशाळेतील मुलांना मेफेटर्माइन इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या तरुणाला अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगलीतून या इंजेक्शनची तस्करी करून कोल्हापुरात पुरवठा करीत असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे येथेही सांगली कनेक्शन चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर विट्याजवळ पुन्हा नशेच्या इंजेक्शन खरेदी-विक्री करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून इंजेक्शनचा साठा जप्त केला. त्यामुळे नशेच्या इंजेक्शनचा बाजार सर्वत्र पसरला असल्याचे दिसून येते.गतवर्षी कुपवाडमध्ये एमडी ड्रग्जचा साठा पकडला. इरळी येथे एमडी ड्रग्जचा कारखान्यावर छापा मारला. विट्याजवळील कार्वे येथेही एमडी ड्रग्जचा कारखाना चव्हाट्यावर आणला. एमडी ड्रग्जचे कनेक्शन, तर मुंबई, गुजरातबरोबर दुबईपर्यंत पोहोचल्याचे पोलिस कारवाईवरून स्पष्ट झाले. इरळीतील कारखाना चालविणाऱ्या सूत्रधारास तर थेट दुबईतून ताब्यात घेऊन अटक केली.एकीकडे गांजा तस्करीचे मिरज हे प्रमुख केंद्र बनले आहे. जत, कर्नाटकमधून येथे मोठ्या प्रमाणात गांजा येतो. गांजा तस्करी २५ वर्षांहून अधिक काळ सुरूच आहे. गांजा तस्करीचे सांगली, मिरज कनेक्शन इतर ठिकाणच्या पोलिस कारवाईवरून स्पष्ट होते. त्याचबरोबर आता एमडी ड्रग्ज तस्करी, नशेच्या इंजेक्शनची तस्करी यामुळे सांगली अमली पदार्थ तस्करीचे केंद्र बनत चालल्याचे दिसून येत आहे. ही बदनामीकारक ओळख नामशेष करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
मेफेटर्माइनचा धोकादायक वापरमेफेटर्माइन या इंजेक्शनची चिठ्ठी एमडी, एमबीबीएस डॉक्टरांना देता येते. परंतु, याची चोरीछुपे शरीरसौष्ठवपटू, व्यायामशाळेतील मुलांना सुरू आहे. इंजेक्शनच्या नशेमुळे जोरदार व्यायाम करून शरीर पिळदार बनवू शकता, असे आमिष दाखवून नशेखोरीच्या बाजारात आणले जाते.
नशेखोरी जिवावर बेततेनशेच्या इंजेक्शनचा व्यायामासाठी वापर केल्यानंतर त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो. त्यातून एका पैलवानाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याच्या आहारी जाणे धोकादायक असूनही काही तरुण मंडळी पिळदार शरीर बनविण्यासाठी वापर करतात.
पोलिस कारवाईनंतरही धाडसविटा येथे एमडी ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर पालकमंत्री यांनी टास्क फोर्सची स्थापना केली. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली. परंतु, त्यानंतरही अमली पदार्थाची चोरी छुपे तस्करी करण्याचे धाडस केले जात आहे. पोलिस कारवाईतूनच ते स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थामुळे जिल्हा चर्चेत सांगली ही नाट्यपंढरी, बुद्धिबळ पंढरी, हळदीची नगरी अशी वेगवेगळ्या नावाने जगभर ओळखली जाते. परंतु, याच सांगलीत गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थाची तस्करी सुरू आहे. अमली पदार्थाच्या तस्करीतही सांगलीचे नाव अलीकडे सर्वत्र चर्चेत येत आहे.