अवकाळीचा कहर; दोन बळी
By Admin | Updated: March 15, 2015 00:30 IST2015-03-15T00:27:10+5:302015-03-15T00:30:46+5:30
गारपीट : खानापूर, मिरज, तासगाव तालुक्यांना तडाखा; द्राक्षबागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त

अवकाळीचा कहर; दोन बळी
सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागाला शनिवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पावसाने दोन बळी घेतले.
विनायक हणमंत बुधावले (वय २०, रा. हातनूर, ता. तासगाव) व सुमन परसू जाधव (५५, जाधववाडी, ता. खानापूर) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या पंधरवड्यात पाचव्यांदा अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्षबागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्यांत गारपीट झाली.
शनिवारी सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी दोनपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पाचनंतर पूर्वभागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. विटा शहरासह खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने खानापूर-मोही रस्त्यावर लिंबाचे झाड, तर तामखडीजवळही मोठे झाड कोसळल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास ठप्प झाली. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना जबर फटका बसला.
हातनूर येथे वीज पडून विनायक बुधावले हा तरुण जागीच ठार झाला. सायंकाळी पाचच्या दरम्यान तो शेतात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेला होता. वादळी वारे सुटल्याने तो जनावरांना घाईगडबडीने घरी घेऊन निघाला. या दरम्यान त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तो जागीच ठार झाला. जाधववाडी (ता. खानापूर) येथे वादळी वाऱ्याने घराच्या छतावरील पत्रा उडून अंगावर पडल्याने सुमन जाधव यांचा मृत्यू झाला. तासगाव तालुक्यात मणेराजुरी परिसरात हलकी गारपीट झाली.
मिरज तालुक्यात बेळंकी, लिंगनूर परिसरात सायंकाळनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. खटावमध्ये गारपीट झाली. यामुळे परिसरातील बेदाणा उत्पादक अडचणीत आला आहे. रब्बी पिकांसह द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे झाले नाहीत, तोपर्यंत शनिवारी पुन्हा पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बेदाणा शेडवर प्रक्रियेत असलेले बेदाणे व द्राक्षांचे नुकसान होणार आहे. दि. ११ ते १३ मार्च या कालावधीत पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील द्राक्षे बेदाण्यासाठी शेडवर टाकली आहेत. पलूस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.