खरसुंडीत खिलार जनावरांच्या यात्रेवर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: January 29, 2016 00:31 IST2016-01-29T00:07:05+5:302016-01-29T00:31:47+5:30

सोयी-सुविधांचा अभाव : बाजार समिती-ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाने यात्रेकरूंत नाराजी

Drought of Kharandit Khilaar animal pilgrimage | खरसुंडीत खिलार जनावरांच्या यात्रेवर दुष्काळाचे सावट

खरसुंडीत खिलार जनावरांच्या यात्रेवर दुष्काळाचे सावट

विक्रम भिसे-- खरसुंडी  -तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथील प्रसिध्द खिलार जनावरांच्या पौषी यात्रेवर दुष्काळाचे सावट पडले असून, कृषी उत्पन्न समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे व्यापारी आणि यात्रेकरूंकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खरसुंडी येथील श्री सिध्दनाथाचे पुरातन मंदिर प्रसिध्द आहे. या ठिकाणच्या पौषी यात्रेला गेल्या कित्येक वर्षांपासून परंपरा आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा अशा अनेक राज्यांतून जातीवंत खिलार जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी वर्ग खरसुंडी येथे दाखल होत असतो. काही दिवसातच करोडो रूपयांची उलाढाल होत असते. ही पौषी यात्रा श्रीनाथ देवस्थानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. दहा-पंधरा वर्षापूवी ही यात्रा खरसुंडी गावासाठी पर्वणी ठरत होती. यापूर्वी यात्रा आठ ते पंधरा दिवस भरत असे आणि मोठी आर्थिक उलाढाल होत असे. मनोरंजनासाठी आठ-आठ दिवस लोकनाट्य तमाशा मंडळे खरसुंडीमध्ये दाखल होत असत. मोठेच्या मोठे पाळणे, अनेक सिनेमा टॉकीज, हॉटेल्स, व्यापारी, दुकाने किमान पंधरा दिवस खरसुंडी नगरीत येत आणि मोठा व्यवसाय करून समाधानाने परत जात. त्यावेळी शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांना गावची यात्रा वैभव वाटत असे.
आज हीच वैभवशाली यात्रा ढिसाळ नियोजनामुळे मोडीत निघत आहे. यात्रेसाठी कृषी उत्पन्न समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाचा अभाव असून या यात्रेमध्ये यात्रेकरूंसाठी पुरेसे पाणी, वीज आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात कमी पडल्याने यात्रेकरूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण यात्रेसाठी फक्त दोन छोट्या टॅँकरने पाणी देण्यात आले. यात्रेसाठी गावाच्या अवती-भवती काही पाण्याच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. यात्रेसाठी पाण्याचे स्टँडपोस्ट बसविण्यात आले होते. या ठिकाणीही पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. खरसुंडी येथील वीज वितरण कार्यालयाने यात्रेसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. यामुळे अनेक यात्रेकरूंना अंधारातच राहावे लागले.
एक तर दुष्काळामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असून यात्रेतील नियोजनशून्य कारभाराचा फटका यात्रेकरूंना बसल्यामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या खरसुंडी नगरीतील पौषी यात्रेत मोठे हाल झाले. यात्रेकरूंमधून संताप व्यक्त करण्यात आला. या यात्रेपासून कृषी उत्पन्न बाजार समितीस दरवर्षी फायदा होत असतो. त्या मानाने येथे पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात ते कमी पडत असल्याचे खरसुंडी ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. तुलनेने ग्रामपंचायत प्रशासनास यात्रेचे खूपच तुटपुंजे उत्पन्न मिळत असल्याने ग्रामपंचायत यात्रेकडे पुरेसे लक्ष देत नाही. मुळात या प्रसिध्द यात्रेसाठी खरसुंडी गावामध्ये शासकीय प्रशासन, कृषी उत्पन्न समिती, व्यापारी देवस्थान, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून यात्रा कमिटी तयार करण्याची गरजेचे आहे. नाही तर अशा नियोजनशून्य कारभारामुळे खरसुंडी नगरीची ही यात्रा मोडीत निघण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
सध्या ही पौषी यात्रा फक्त आठ दिवसांची राहिली आहे. दोन दिवस यात्रा भरण्यासाठी जातात. त्यानंतर दोन ते तीन दिवस यात्रा तुडुंब भरून वाहते आणि दोन दिवसात यात्रा रिकामी होण्यास सुरुवात होते. यामुळे यात्रेसाठी आलेली हॉटेल्स, मिठाईवाले, खानावळी, व्यापारी दुकाने यांना ही यात्रा फायद्याची ठरत नसून नुकसानच होत असते. यातूनच व्यापारी वर्गात मोठी नाराजी दिसून येते. तोट्याचा व्यवसाय असल्याने अलीकडे मनोरंजनासाठी मोठे पाळणे, लोकनाट्य तमाशा मंडळे या यात्रेमध्ये दाखल होत नाहीत.
करांचा मोठा बोजा शेतकऱ्यांवर आणि यात्रेकरूंवर लादला जात असल्याने यात्रेकरू आणि व्यापारी यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खरसुंडी नगरीत यात्रेसाठी दाखल होताना पोलीस यंत्रणेकडून टेम्पो, ट्रक आदी वाहने अडवून रक्कम उकळली जाते. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व विभागातील यंत्रणा ही आपापल्या विभागास उत्पन्नाचा फायदा मिळविण्यासाठी तत्पर असून, यात्रा मात्र मोडकळीस आल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.


विनालाठी-काठी शर्यतीस परवानगीची मागणी
जातीवंत खिलार जनावरे जोपासण्यासाठी किंवा खिलार टिकविण्यासाठी शासनाने विनालाठी-काठी शर्यतीसाठी परवानगी द्यावी, तरच खिलार पशुधन टिकेल, असे मत ‘माणदेशाचा माण हिरा’, अखिल भारतीय स्तरावरील पारितोषिक प्राप्त आटपाडी तालुक्यातील एकमेव पशुपालक संताजीराव जाधव या शेतकरी बंधूने व्यक्त केले. त्यांच्याकडील सध्या असलेल्या खिलार खोंडास दोन लाखाची मागणी झाली. आटपाडीतील मनोज भागवत म्हणाले की, दुष्काळामुळे कमी यात्रेकरू आल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाची शर्यतीस बंदी आहे. त्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला असून शेतकरीहिताचा विचार करावा आणि पशुधन वाचवावे.

हॉटेल चालकांना आर्थिक फटका
यात्रेदरम्यान गेले चार-पाच दिवस कमी यात्रेकरूंमुळे मोठे नुकसान झाले. गेले तीन दिवस पाचशे ते सातशे रूपयांचा व्यवसाय झाल्याने येण्या-जाण्याचा खर्चही निघत नसल्याची खंत हॉटेल मालक सिध्देश्वर चौगुले यांनी व्यक्त केली.

Web Title: Drought of Kharandit Khilaar animal pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.