वाहनचालकहो, जरा जपून, सांगली-मिरज रस्ता राहिला नाही सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:51+5:302021-08-24T04:30:51+5:30
ओळ : सांगली-मिरज रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी सह्याद्रीनगरकडे जाणाऱ्या चौकातील रस्त्याचे हे छायाचित्र. लोकमत न्यूज ...

वाहनचालकहो, जरा जपून, सांगली-मिरज रस्ता राहिला नाही सुरक्षित
ओळ : सांगली-मिरज रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी सह्याद्रीनगरकडे जाणाऱ्या चौकातील रस्त्याचे हे छायाचित्र.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली-मिरज रस्त्याची चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसापूर्वी मर्यादित संख्येने असणारे खड्डे पावसानंतर खूपच वाढले आहेत.
रस्ता रुंद असल्याने वाहने भरधाव असतात; पण मध्येच अचानक येणारा खड्डा त्यांना अपघाताकडे घेऊन जातो. मिरजेतून सांगलीकडे येताना वंटमुरे कॉर्नरपासूनच खड्ड्यांची माळ सुरू होते. वंटमुरे कॉर्नर, महसूल भवन, सिद्धिविनायक रुग्णालय, पार्श्वनाथनगर, विश्रामबाग सिग्नल, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती येथे जीवघेणे खड्डे तयार झालेत. विश्रामबागमध्ये सिग्नलखालीच खोलवर खड्डा तयार झाला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी सह्याद्रीनगरकडे जाणाऱ्या चौकातील खड्डा वर्षानुवर्षे कायम आहे. मिरजेत पार्श्वनाथनगर ते रेल्वे पुलापर्यंतचा सुमारे ३०० मीटरचा रस्ताही जीवघेणा ठरत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुमारे ३५ लाखांचा खर्च करून पट्टे मारले गेले, त्यामुळे रस्ता देखणा झाला. पण त्याची सुरक्षितता संपली आहे.
या रस्त्यावरील पथदिवेही बंदच आहेत. लाखो रुपये खर्चून हायमास्ट दिवे उभारले; पण ते सुरू ठेवण्याकडे दुर्लक्ष आहे. पथदिव्यांची जबाबदारी महापालिकेची की सार्वजनिक बांधकामच्या विद्युत विभागाची हेच नेमके स्पष्ट होत नाही. दिवे सुरू झाले तर अंधारात वाहनचालकांना खड्डे तरी चुकवता येतील अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक वाहतुकीच्या रस्त्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी मिळेना झाला आहे. कोरोनामुळे निधीमध्ये कपात झाल्याचा फटका रस्त्यांना बसत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती दोन-दोन वर्षे रखडली आहे. मिरजेत शास्त्री चौक ते रेल्वे उड्डाण पूल या म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरही भलेमोठे खड्डे तयार झाले आहेत.
चौकट
वाहनचालकांनो, येथे जरा जपूनच
वंटमुरे कॉर्नर, महसूल भवन, सिद्धिविनायक रुग्णालय, पार्श्वनाथनगर, विश्रामबाग सिग्नल, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती. पार्श्वनाथनगर ते रेल्वे पूल.
कोट
रस्ते दुरुस्तीसाठी निधीची चणचण आहे. सांगली-मिरज रस्त्याविषयी सोमवारी सकाळीच बैठक झाली. निधी नसला तरी काहीतरी मार्ग काढून रस्त्याची दुरुस्ती करणार आहोत.
- संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज