विट्यात विनाचालक ट्रक दुकानात घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:16+5:302021-06-30T04:18:16+5:30

विटा : रस्त्याकडेला उतारावर उभा केलेला विना चालक मालवाहतूक ट्रक विटा शहरातील मायणी रस्त्यावरील तीन दुकानात घुसून झालेल्या दुर्घटनेत ...

A driverless truck rammed into a shop in Vita | विट्यात विनाचालक ट्रक दुकानात घुसला

विट्यात विनाचालक ट्रक दुकानात घुसला

विटा : रस्त्याकडेला उतारावर उभा केलेला विना चालक मालवाहतूक ट्रक विटा शहरातील मायणी रस्त्यावरील तीन दुकानात घुसून झालेल्या दुर्घटनेत सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मायणी रस्त्यावरील श्रीरामनगर येथे घडली. याप्रकरणी ट्रक चालक सुनील अंकुश गेजगे (रा. कोळेगाव, ता. माळशिरस) यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महूद (ता. सांगोला) येथून मका घेऊन आलेला मालवाहतूक ट्रक (क्र. एमएच ११ एम ६२६८) मंगळवारी सकाळी मायणी रस्त्यावरील वजन काट्यावर आला. वजन झाल्यानंतर हा ट्रक विट्यातील एका ठिकाणी मका उतरण्यासाठी निघाला होता. मात्र चालकाला पत्ता माहिती नसल्याने तो विचारण्यासाठी चालक सुनील गेजगे याने ट्रक श्रीरामनगर येथील मुख्य रस्त्यावरील उतारावर उभा करून हँड ब्रेक लावला व तो पत्ता विचारण्यासाठी ट्रकमधून खाली उतरला.

यावेळी अचानक हँड ब्रेक निघाल्याने ट्रक उतारावरून वेगात धावू लागला. विनाचालक ट्रक रस्त्याकडेला असलेल्या चिकन सेंटर, श्री बॅटरी दुकान व एका आईस्क्रीम दुकानात घुसला. त्याच वेळी दुचाकीवरून चिकन घेण्यासाठी आलेले प्रदीप राठोड यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी मारली. ते जखमी झाले. मात्र त्यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला.

अपघातात सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी ट्रक चालक सुनील गेजगे याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो : २९ विटा २.. ३

ओळ : विटा येथील मायणी रस्त्यावर उतारावर उभा केलेला विनाचालक ट्रक हँड ब्रेक मधून निघाल्याने रस्त्याकडेच्या तीन दुकानात घुसून मोठे नुकसान झाले.

Web Title: A driverless truck rammed into a shop in Vita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.