जिगरबाज शेतकऱ्यांमुळे पाणीच पाणी
By Admin | Updated: May 10, 2016 02:30 IST2016-05-10T02:06:29+5:302016-05-10T02:30:50+5:30
६२ लाखांचे बिल भरले : आटपाडीकरांचे एक पाऊल पुढेच; तलाव भरणार

जिगरबाज शेतकऱ्यांमुळे पाणीच पाणी
अविनाश बाड- आटपाडी --उपसासिंचन योजनांच्या भरमसाट बिलांमुळे अवाच्या सवा दराने आकारलेली पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरणे कठीण होती. त्यामुळे या योजना बंद पडण्याची भीती निर्माण झालेली असताना, आटपाडी तालुक्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी आजअखेर टेंभू योजनेच्या पाण्यासाठी तब्बल ६१ लाख ४ हजार ८२८ रुपये भरले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील ७ तलाव आणि या तलावांना जोडणाऱ्या ओढ्यांतून १७४.४२ द.ल.घ.फूट एवढे कृष्णामाईचे पाणी ऐन उन्हाळ्यात मिळणार आहे.
सध्या आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव पाण्याविना कोरडे पडू लागले आहेत. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आटपाडी तलावातील पाणीही संपत आल्याने गाळमिश्रित पाणी पुरवठा केला जात आहे. शुक्रवार दि. ६ पासून टेंभू योजनेचे पाणी कामथ तलावातून ओढ्याने आटपाडी तलावात सोडले जात आहे. त्यामुळे आटपाडी तलावातील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे.
हे पाणी येण्यापूर्वी तलावात केवळ १५ द.ल.घ.फूट एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या तलावामध्ये २७.१९ द.ल.घ.फूट एवढा मृत पाणी साठा होता. म्हणजे हे पाणी गाळातील न वापरण्यासारखे आहे. पण अशा पाण्यावर आटपाडीकर तहान भागवत आहेत.
शनिवारी तलावात २५ द.ल. घ.फूट एवढा पाणी साठा झाल्याने पाटबंधारे विभागाने परवानाधारक ३० शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीने तोडलेली विजेची कनेक्शन्स जोडण्यासाठी वीज कंपनीला पत्र दिले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पाणी उपसा करताना मीटर बसविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे पाण्याची बचत तर होणारच आहे, पण त्याचबरोबर पाणी समस्या उद्भवणार नसल्याचेही तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सध्या आटपाडी आणि कचरेवस्ती तलावात टेंभूचे पाणी सोडले आहे. या तलावात सध्या ५०.६२ द.ल.घ.फूट एवढा पाणी साठा आहे. निंबवडे तलावात पाणी सोडण्यासाठी माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी शनिवारी १३ लाख रूपये धनादेशाने भरले आहेत. त्यामुळे निंबवडे तलावात येताना पारेकरवाडी ते निंबवडे तलावापर्यंत ओढ्याने पाणी सोड्यात येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.