लाभक्षेत्रातील तलावांमध्ये पाणी सोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 00:49 IST2015-06-07T23:43:34+5:302015-06-08T00:49:39+5:30
‘ताकारी, टेंभू’चे आवर्तन सुरूच : कडेगावमधील शेतकऱ्यांची मागणी

लाभक्षेत्रातील तलावांमध्ये पाणी सोडा!
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू योजनांच्या लाभक्षेत्राला मान्सूनपूर्व वळीव पावसाने झोडपले. यामुळे बहुतांशी शेतजमिनींची तहान भागली आहे. सध्या ताकारी, टेंभू या दोन्ही योजनांचे आर्वतन सुरु आहे. पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाल्याने, तसेच दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील पुढील तालुक्यांना पाण्याची गरज असल्याने, आवर्तन बंद करता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील तलाव आताच पाणी सोडून भरून घ्यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
ताकारी योजनेचे पाणी चिंचणी तलावात सोडले आहे. या तलावात जादा पाणी सोडून तलावात पाणीसाठा करावा, अशी मागणी देशभक्त शामराव मास्तर पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुबराव महाडिक यांनी केली आहे. चिंचणी तलावातील पाणीसाठा हा ताकारी योजनेसाठी रिझर्व टँक (राखीव पाणी साठवण तलाव) म्हणून वापरला जातो. हा तलाव भरुन घेतल्यास टंचाई काळात पाणी वापरता येते. याशिवाय ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील अन्य छोटे तलावही भरुन घेतल्यास टंचाईची स्थिती निर्माण झाल्यास मदत होऊ शकते, त्यामुळे सर्व तलाव आताच भरून घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या टेंभू योजनेचे पाणी सुर्ली कालव्याद्वारे सुरु आहे. १६ जूनपर्यंत या योजनांचे आर्वतन सुरु राहणार आहे. नंतर पाऊस वेळेवर न पडल्यास टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे पावसावर अवलंबून न राहता आवर्तन पूर्ण होण्याआधी टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील कडेगाव तालुक्याच्या हद्दीतील बोंबाळेवाडी, कडेगाव, शिवाजीनगर, हिंगणगाव (बुद्रुक) या मोठ्या तलावांसह इतर छोटे तलावही भरुन घ्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ज्या गावांच्या परिसरात पाऊस कमी झाला आहे, तेथे शेतजमिनीलाही आवर्तनाच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती या योजनांच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
पाणीपट्टी वसुलीवर योजनांचे भवितव्य
‘ताकारी आणि टेंभू’ या दोन्ही योजनांच्या पाणीपट्टी वसुलीतून योजनांचे वीजबिल भरले जाते. सोनहिरा, केन अॅग्रो, क्रांती, उदगिरी शुगर्स आदी कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करुन योजनेकडे भरतात. ही पाणीपट्टी वसुली सक्षमपणे झाल्यामुळे वीजबिल भरले जाते. आता दोन्ही योजनांसाठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरु झाला आहे. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी वितरण व पाणीपट्टी वसुली, तसेच पाणीपट्टी आकारणी होणार आहे. परंतु तरीही पाणी वापर संस्थांनाही कारखान्यांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.