शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

द्रष्टा शिक्षणकर्मी : प्रा. आर. ए. कनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. रफीक तथा आर. ए. कनाई यांचा जीवनप्रवास सर्वसामान्य तरुणांना अत्यंत ...

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. रफीक तथा आर. ए. कनाई यांचा जीवनप्रवास सर्वसामान्य तरुणांना अत्यंत प्रेरणादायी ठरण्यासारखा. शाळकरी वयात कॅन्टीनमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चहा-नाश्ता देणाऱ्या रफीक कनाई यांनी आपणही मोठेपणी इंजिनिअरच व्हायचे ही खूणगाठ बांधली. झालेदेखील ! आजमितीला पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणाच्या क्षेत्रात सरांचा शब्द प्रमाण मानला जातो. एक द्रष्टा अभ्यासक, दूरदृष्टीचा शिक्षणतज्ञ, डोळस अध्यात्मवादी, प्रेमळ पालक आणि दिशादर्शी नेतृत्व अशा अनेकविध रूपांत कनाईसर भेटत राहतात.....

अबू कनाई यांचे कुटुंब मूळचे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातले. चरितार्थासाठी ६० च्या दशकात कराडला आले. सुरुवातीला पानपट्टी आणि नंतर कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅन्टीन चालवू लागले. छोटा रफिक शाळा सुटल्यावर कॅन्टीनमध्ये मदत करायचा. त्याकाळी इंजिनिअरिंगसाठी घरदार पाठीवर टाकून कराडला आलेल्या मुलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असायची, परंतु अबूचाचा पाठीशी राहिले. होस्टेलच्या मुलांसाठी ते हक्काचा माणूस होता. छोट्या रफिकला यातूनच माणुसकीचे संस्कार मिळत गेले.

रफीक कनाई सरांचे बालपण गरिबीतले, पण संस्कारांची श्रीमंती मोठी. कॅन्टीन हेच घर झाले होते. मार्केटमधून भाजी आणण्याने सुरू झालेला दिवस कॅन्टीनमध्ये शेवटचे टेबल पुसेपर्यंत संपायचा नाही. इंजिनिअरिंगच्या मुलांना चहा, नाश्ता, जेवण देता-देता अबूचाचांच्या मनातही इंजिनिअरिंगविषयी कुतूहल निर्माण झाले. छोट्या रफीकनेही इंजिनिअरच झाले पाहिजे असे स्वप्न त्यांनी पाहिले.

रफीकने कराडच्या होली फॅमिली स्कूलमधून दहावी पूर्ण केली. शासकीय तंत्रनिकेतनमधून डिप्लोमा तर नांदेडमधून पदवी पूर्ण केली. काहीकाळ पुण्यात बजाज ऑटोमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून कामही केले, पण नोकरीत रमले नाहीत. राजीनामा देऊन इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. धातूविज्ञान हा अतिशय क्लिष्ट विषय सोप्या भाषेत शिकवताना स्वत:चे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. अंगभूत हुशारी, कष्टाची तयारी, नवनिर्मितीचा ध्यास, सातत्याने नवे शिकण्याची वृत्ती यामुळे प्रगतीचा आलेख उंचावत गेला. लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, प्लेसमेन्ट ऑफिसर, एनबीए समन्वयक, टेक्विप समन्वयक अशा पदांवर ठसा उमटवला. हा हिरा मंत्री जयंत पाटील यांच्या नजरेत भरला. त्यांच्याकडे उपप्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली, तीदेखील सरांनी समर्थपणे पेलली.

२००८ मध्ये आरआयटीमधून बाहेर पडून विट्याच्या आदर्श कॉलेजचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले. अवघ्या सहा महिन्यांतच आदर्श तंत्रनिकेतन उभारले. याचदरम्यान वडिलांचे निधन झाले, पण दु:ख बाजूला सारून महाविद्यालयाला प्राधान्य दिले. निधनाच्या चौथ्याच दिवशी कामावर रुजू झाले.

२००९ मध्ये चिमणभाऊ डांगे यांच्या विनंतीमुळे आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलामध्ये कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती घेतली. डांगे कुटुंब खरेतर राजकारणी, पण संकुलाच्या निर्णयांत कनाई सरांना फ्री हॅण्ड दिला. त्याचा पुरेपूर फायदा सरांनी घेतला. संकुलाने शैक्षणिक वेग घेतला. २४० क्षमतेचे अभियांत्रिकी महाविद्यालय ५४० पर्यंत विस्तारले. एरोनॉटिकल इंजिनिअरींग, फूड टेक्नोलॉजीसारख्या नव्या विद्याशाखा सुरु झाल्या. २०१६ मध्ये फार्मसी सुुरू केली, आज महाराष्ट्रभरात डांगेची फार्मसी गुणवत्तापूर्ण मानली जाते. ज्येष्ठ नेते शरद पवारही संकुलातील कल्पकता व दूरदृष्टी पाहून चकीत झाले. आपल्या संस्थेतील शिक्षकांना बारामतीहून आष्ट्याला पाठविले. डांगेच्या कामाची पद्धत व नवोपक्रमांचा अभ्यास करायला सांगितले. रयतच्या शिक्षकांनीही कनाईसरांनी तयार केलेला डांगे पॅटर्न ऑंखो देखा पाहिला.

सरांना भेटताक्षणी गांधीवादी विचारसरणीचा प्रत्यय येतो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व भारावून टाकल्याशिवाय राहत नाही. अभियांत्रिकीमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर इतके उच्च विद्याविभूषित असूनही सरांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. सर्वोच्च प्रशासकीय पदावर असतानाही प्राध्यापकांपासून सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांशी स्नेहबंध एकाच पातळीवरचा आहे. इंजिनिअरिंगसाठी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना कनाई सरांच्या रूपाने हक्काचे आई-वडील मिळतात. प्रत्येक अडचणीत सर हाकेला ओ देतील हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. अर्थात, सरांनी आपल्या वर्तनातूनच तो कमावलाय.

गुणवत्तेला सरांची नेहमी सर्वोच्च प्राथमिकता राहिली. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आउटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) संकल्पना राबविणारे ते पहिलेच. ओबीई संकल्पना म्हणजे कॉलेजमध्ये जे शिकवले जाते, त्यातील कितपत ज्ञान विद्यार्थ्यांच्या गळी उतरले याची फेरतपासणी. त्याचे अनुकरण आता अन्य कॉलेजमध्येही सुुरू झाले आहे. इंजिनिअरिंगसाठी नॅक मूल्यांकनाचे धाडसही कनाई सरांनी डांगे संकुलासाठी केतले.

विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व जिमखाना उभा केला. संकुलाच्या लौकिकासाठी राष्ट्रीय संस्थांकडून मूल्यांकन करून घेतले. त्यामुळेच सर्व पात्र अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन मिळाले आहे. २०१५ मध्ये नॅक, बंगळुरूकडून ‘अ’ दर्जा मिळाला. आयएसओ ९००१:२०१५ मानांकनही मिळवले. सर्व अभ्यासक्रमांना शिवाजी विद्यापीठाकडून निरंतर संलग्नीकरण प्राप्त झाले आहे. यापुढे जात महाविद्यालयाला २०१७ मध्ये “स्वायत्त दर्जा” ही मिळवला.

भविष्यातल्या दहा वर्षांतले शैक्षणिक बदल आजच संकुलात आणण्याचा सरांचा प्रयत्न असतो. त्यासाठी जगभरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष असते. डांगेचा विद्यार्थी जगभरात कोठेही मागे हटला नाही पाहिजे ही दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आहे. फक्त पदवी देण्यापुरती मर्यादित जबाबदारी नसून विद्यार्थ्याला उद्याचा ज्ञानसंपन्न, कौशल्यपूर्ण नागरिक घडवायचे आहे हे सरांच्या पक्के ध्यानात आहे. त्यामुळे संपूर्ण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष देतात.

सरांचा आध्यात्मिक अभ्यासही मोठा, पण त्याचे अवडंबर कधीच माजवले नाही. कॉलेजचे सहकारी सोमवारी नॉनव्हेज खात नाहीत हे लक्षात येताच ईदच्या बिर्याणीचा बेत पुढे ढकलण्याचा मोठेपणा सरच दाखवू जाणोत ! आळंदीला शैक्षणिक उपक्रमासाठी सहकाऱ्यांसमवेत गेले असता त्यांना न सांगता माउलींचे दर्शन घडवणारेही कनाईसरच !! संकुलातील प्रत्येकाला अडचणीच्या काळात मन मोकळे करण्यासाठी कनाईसर हक्काचे ठरतात. संकुलाच्या दैनंदिन साफसफाईचे काम एका नामांकित संस्थेला देण्याचे ठरले तेव्हा संकुलातील पन्नासेक महिला कर्मचाऱ्यांवर गंडातर येऊ लागले, तेव्हा त्या संस्थेला ठामपणे नाही म्हणणारेही कनाईसरच !!! आजारपण, आर्थिक अडचण, पूर परिस्थिती, लॉकडाऊन या सर्व काळात सरांनी कर्मचार्यांची कुटुंबीयाप्रमाणे काळजी घेतली. अर्थात याचे तीळमात्र श्रेय ते घेत नाहीत. नीतिमत्ता चांगली ठेवली की आपोआप चांगले घडत जाते ही त्यांची श्रद्धा आहे. शिक्षणातून यापेक्षा वेगळे काय अपेक्षित असावे ? कनाई सरांची ही वाटचाल नवतरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.

चौकट

अबूचाचांनी इम्पाला गाडी घेतली, पण ती विद्यार्थ्यांच्याच दिमतीला राहिली. बारा-तेरा वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका बॅचने गेट टुगेदर केले, तेव्हा अबुचाचांना व्यासपीठावर बोलवून लाखभराची थैली विद्यार्थ्यांनी त्यांच्या हवाली केली. चाचांच्या मनाची श्रीमंती लाखांच्या थैलीने मोजण्यासारखी खचितच नव्हती. त्याच थैलीत अबुचाचांनी स्वत:ची काही रक्कम घालून ती थैली बॅचला सामाजिक उपक्रमांसाठी परत केली. आजही हे कॅन्टीन ‘अबूचे कॅन्टीन’ म्हणूनच ओळखले जाते. मनाची याच श्रीमंतीचा वारसा कनाईसरांना वडिलांपासून मिळाला आहे.

---------