ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी तहसीलदारांकडे!
By Admin | Updated: September 18, 2015 00:08 IST2015-09-17T23:04:49+5:302015-09-18T00:08:07+5:30
राष्ट्रवादीच्या तक्रारीची दखल : आराखडाबाह्य कामे महापालिकेस भोवणार

ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी तहसीलदारांकडे!
सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील घोटाळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत या घोटाळ्याचा चौकशीसाठी मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांची नियुक्ती केल्याचे समजते. लवकरच घाडगे हे ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. विभागीय आयुक्तांनी त्यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विकास महाआघाडीच्या काळात सांगली व मिरज या दोन शहरातील ड्रेनेज योजना मंजूर झाली होती. सांगलीसाठी ७७ कोटी, तर मिरजेसाठी ५६ कोटींच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली. जादा दराच्या निविदेमुळे ड्रेनेज योजनेचा खर्च दोनशे कोटींच्या घरात पोहोचला आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. एमजीपीच्या देखरेखीखाली ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. ड्रेनेजच्या कामातील अनियमिततेवर अनेकदा वाद रंगला होता. या कामाचा महासभा, स्थायी समिती सभेत अनेकदा पंचनामा करण्यात आला आहे. ठेकेदाराला एप्रिल २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती, पण आजअखेर ३५ ते ४० टक्केच काम झाले आहे. अजूनही अनेक भागात ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकलेल्या नाहीत. उलट ठेकेदारांची बिले मात्र प्रशासनाकडून वेळोवेळी अदा केली जात आहेत. त्यात मिरजेतील १६ किलोमीटर जादा पाईपलाईन टाकण्यात आल्याचे उघड झाले. ड्रेनेजच्या मूळ आराखड्यात समाविष्ट नसलेली कामे प्रशासन व एमजीपीच्या आशीर्वादाने सर्वात आधी पूर्ण करण्यात आली. या कामापोटी ठेकेदाराला साडेतीन ते चार कोटींचे बिलही अदा करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी समक्ष योजनेची पाहणी केली. त्यानंतर ड्रेनेज योजनेतील या घोटाळ्याबाबत माजी मंत्री जयंत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्तीचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यांनी चौकशी अधिकारी म्हणून मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांची नियुक्ती केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. येत्या दोन ते तीन दिवसात त्यांना आदेश प्राप्त होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अद्याप आदेश नाहीत : घाडगे
मिरजेतील ड्रेनेज घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तहसीलदार घाडगे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त गुरुवारी दिवसभर शहरात होते. याबाबत घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात आपणाला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे कोणतेही आदेश मिळालेले नसल्याचे सांगितले.