ड्रेनेजचा कासवगतीने कारभार
By Admin | Updated: November 23, 2014 00:44 IST2014-11-23T00:44:13+5:302014-11-23T00:44:13+5:30
वाहतूक विस्कळीत : वाहनधारक, नागरिकांचे हाल

ड्रेनेजचा कासवगतीने कारभार
सांगली : ड्रेनेजसाठी मोठी खुदाई करताना पाईपलाईनचे काम करून तातडीने रस्ता पूर्ववत करण्याबाबत तत्परता दिसत नसल्याने शहरात अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. खणभागातही छोट्या बोळांमध्ये झालेल्या खुदाईमुळे नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल झाले आहे.
कॉलेज कॉर्नरवरून चारही दिशांना ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. याठिकाणी ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आली. ही खुदाई करताना कुठेही बॅरिकेटस् लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पहिल्यादिवशी वाहनधारकांची तारांबळ उडाली. गत रविवारी याचठिकाणी एक ट्रक अडकला. वाहनांची दाटी गेली आठवडाभर सुरू आहे. ड्रेनेजची पाईपलाईन टाकल्यानंतर केवळ मुरुमाचे ढिगारे करून रस्त्यात अडथळा करण्यात आला. ड्रेनेजमधून बाहेर फेकले गेलेले पाणी याठिकाणच्या रिक्षा थांब्यावर मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना या चौकात कसरत करीत पुढे जावे लागत आहे.
खणभाग परिसरात केसरे गल्लीत सध्या ड्रेनेजसाठी मोठी खुदाई केली आहे. याठिकाणी गेली आठवडाभर कासवगतीने काम सुरू आहे. दाट लोकवस्ती असल्याने याठिकाणच्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी आधीच अपुरी जागा होती, आता पूर्ण रस्ताच खोदल्याने नागरिकांना वाहने दूर लावून कसरत करीत घर गाठावे लागत आहे. रोजची ये-जा करतानाही मुश्किल झाले आहे. आधुनिक साहित्य असतानाही इतक्या मंदगतीने कामे कशी सुरू आहेत, असा सवाल आता नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. महापालिकेचे या कामांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. रस्त्यांची कामे करण्यापूर्वी खुदाईची, पाईपलाईनची कामे करण्याबाबतचा ठराव महापालिकेत झाला होता. त्यानुसार भविष्यात कामे होणे आवश्यक आहे. अन्यथा रस्त्यांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
नियमांचे पालन नाही
रस्ते आणि ड्रेनेजच्या कामाबाबतचे ठोस नियोजन सध्या महापालिकेकडे नसल्याचे दिसून येत आहे. कोणते काम किती दिवसात पूर्ण होणार, कोणत्या ठेकेदारामार्फत ते काम सुरू आहे, किती खर्चाचे काम आहे, याबाबतची माहिती कोणालाही नाही. नागरिकांसाठी माहिती फलक प्रत्येक कामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असताना त्या गोष्टीही टाळण्यात येत आहेत.