विटा : प्रसूतीच्या वेळेस महिला रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खानापूर येथील डॉ. उदयसिंह विजयसिंह हजारे (वय ४९, रा. खानापूर) यांना विटा न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील सविता संदीप पवार (वय २३) या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती जास्तच नाजूक झाल्याने नातेवाइकांनी तिला खानापूर येथील हजारे हॉस्पिटल येथे दाखल केले . प्रसूतीकळा सुरू असताना उपलब्ध सुविधा व आवश्यक कौशल्य यांचा विचार करून योग्यवेळी तिला पुढील उपचारकामी दुसऱ्या सर्व सोयींनी युक्त रुग्णालयात पाठवणे आवश्यक होते.मात्र, डॉ. उदयसिंह हजारे यांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठविले नाही. परिणामी त्यांनी उपचारात निष्काळजीपणा दाखविला. त्यामुळे पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिथे व्यवस्थित व वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान गुरुवारी विटा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व न्यायाधीश शेख यांनी डॉ. उदयसिंह विजयसिंह हजारे यांना २ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांनी केला होता. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. एस. एस. यादव व ॲड. व्ही.एस. कोकाटे यांनी काम पाहिले.
चौकशी समितीचा अहवाल निर्णायक..याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर नातेवाइकांनी हलगर्जीपणाबद्दल तक्रार दाखल केली. या प्रकाराची जिल्हा शल्यचिकित्सक आणि सांगलीतील शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या दि.२६ मार्च २०१९ रोजीच्या अहवालानुसार डॉ. उदयसिंह हजारे यांच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी चौकशी समितीचा अहवाल निर्णायक ठरला आहे.