क्रांतिकारकांच्या स्मारकांची पडझड
By Admin | Updated: August 11, 2014 00:16 IST2014-08-10T23:36:00+5:302014-08-11T00:16:59+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : अनेक ठिकाणी दारे, खिडक्या गायब

क्रांतिकारकांच्या स्मारकांची पडझड
बिळाशी : स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. येता स्वातंत्र्यदिनही दिमाखात साजरा होईल. पण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, त्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारकांची झालेली दयनीय अवस्था डोळ्यात पाणी आणणारी आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशी, मांगरुळ, आरळा व सोनवडे येथील सर्वच स्मारकांची पडझड झाली असून मोठी दुरवस्था झाली आहे. कसलं स्वातंत्र्य अन् कसलं काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
१९४७ मध्ये १४ आॅगस्टला मध्यरात्री लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवताना सद्भावना व्यक्त करताना नियतीने केलेल्या कराराची फलोधारणा सफल झाली असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य प्राप्तीला ६७ वर्षे पूर्ण झाली. वसंतदादांनी सांगलीच्या जाहीर सभेत तुरुंग फोडल्याची घटना सांगताना दंडातून गोळी गेल्याचे सांगताच बॅ. ए. आर. अंतुले यांनी दादांच्या त्यागाचा तर गौरव केलाच, परंतु ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्या देशभक्तांसाठी हुतात्मा स्मारके उभारण्याचा संकल्प बोलून दाखविला व अंमलातही आणला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्मारके उभारली गेली.
पण गेल्या काही वर्षात डागडुजी आणि रंगरंगोटीअभावी हुतात्मा स्मारकांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणच्या फरशा काढून नेण्यात आल्या असून, विजेचे बल्ब वायरिंग याचा पत्ताच नाही. स्मृतिस्तंभ दुभंगले असून, त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी या स्मारकांचा वापर धान्य उन्हात घालण्यासाठी, तर मांगरुळ या ठिकाणी कडबा भरण्यासाठी केल्याचे शिराळा तालुक्यातील चित्र होते.
स्मारके स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरित करून देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दिल्यास हुतात्मांच्या स्मृतींना सन्मानाने जपले जाईल. शिराळा तालुक्यातील मांगरुळ, बिळाशी, आरळा, सोनवडे येथील स्मारके शासनाने त्या-त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून त्यांची सर्वस्वी जबाबदारी द्यायला हवी. सध्या भरीव निधी देऊन त्यांच्या डागडुजीची गरज आहे. रंगरंगोटी व डागडुजी केल्यास हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल. त्याकरिता मानसिकता बदलायला हवी. (वार्ताहर)