बेळंकीतील दुहेरी खून तिघांच्या टोळीकडून

By Admin | Updated: December 25, 2014 23:59 IST2014-12-25T23:19:43+5:302014-12-25T23:59:22+5:30

अखेर छडा : एकास अटक; चोरीच्या उद्देशानेच कृत्य

Double murder of Belunki from three gangs | बेळंकीतील दुहेरी खून तिघांच्या टोळीकडून

बेळंकीतील दुहेरी खून तिघांच्या टोळीकडून

सांगली : अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या बेळंकी (ता. मिरज) येथील दुहेरी खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. तिघांच्या टोळीने चोरीच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एकास अटक करण्यात यश आले आहे.
शबनम ऊर्फ शबऱ्या ऊर्फ सुनील लक्ष्मण ऊर्फ लसणाप्पा पवार (वय १९, रा. कवळगी, ता. अथणी, सध्या रा. गणपती माळ, आरग, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
बेळंकी येथे १३ डिसेंबरला यल्लम्मादेवीची यात्रा सुरू होती. यात्रेसाठी सुनीता महादेव गायकवाड (३५, रा. बेळंकी) व मंगल सुधाकर येवारे (४५, कृष्णा घाट, मिरज) यांच्यासह पाच महिला गेल्या होत्या. देवीचे दर्शन व यात्रा आटोपून त्या परतत होत्या. बेळंकी-आरळहट्टी रस्त्यावरून त्या निघाल्या होत्या. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सुनीता गायकवाड व मंगल येवारे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने जिल्हा हादरला होता. या घटनेच्या तपासासाठी पाच स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. सलग पंधरा दिवस तपास सुरू होता.
अटकेतील शबऱ्या पवार आरगचे सरपंच एस. आर. पाटील यांच्या शेतात ऊसतोडीचे काम करतो. तो पहिल्यांदाच सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. त्याचा वडील कर्नाटक पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तोही सध्या अथणीतील कारागृहात आहे. शबऱ्याने फरार साथीदारांच्या मदतीने यात्रेहून परतणाऱ्या महिलांना लुटण्याचा बेत आखला होता. घटनेदिवशी ते रात्री साडेसातपासून अंधारात दबा धरून बसले होते. त्यावेळी सुनीता गायकवाड व मंगल येवारे यांच्यासह पाच महिला हातातील बॅटरीच्या उजेडात येताना त्यांना दिसताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.
पोलीसप्रमुख सावंत म्हणाले की, सुनीता गायकवाड व मंगल येवारे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न
केल्याने त्यांच्यावर तिघांनी चाकूने हल्ला केला.
अन्य दोन महिलांनी दागिने काढून दिल्याने त्यांच्यावर हल्ला
झाला नाही.
येवारे यांना एकच घाव वर्मी बसल्याने त्या जागीच मरण पावल्या. गायकवाड यांनी प्रतिकार करताना एकाचा शर्टही फाडला. त्यामुळे त्यांच्यावर सर्वाधिक आठ वार केल्याची माहिती शबऱ्याने चौकशीत दिली आहे.


पथकाला
२१ हजारांचे बक्षीस
गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, सागर लवटे, गुंड्या खराडे, संतोष पुजारी, संजय कांबळे, पप्पू सुर्वे, वैभव पाटील, दिलीप हिंगाणे, पुणे दहशतवादविरोधी पथकात नियुक्तीस असलेले साईनाथ ठाकूर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संगणक विभागातील संदीप गुरव, योगेश पाटील, भूषण पाटील यांच्या पथकाने या दुहेरी खुनाचा छडा लावला. पोलीसप्रमुखांनी पथकास २१ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. यातील ठाकूर मिरजेचे असून, ते पूर्वी सांगली पोलीस दलात सेवेत होते.



दोनशे गुन्हेगारांची चौकशी
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, मिरज ग्रामीणचे देवीदास सोनवणे, बाजीराव पाटील, कुपवाडचे संजय मेंढे यांची स्वतंत्र पथके सलग पंधरा दिवस तपास करीत होती. कर्नाटक, सोलापूर, पंढरपूर व पुणे येथील गुन्हेगारी अड्ड्यांवर छापे टाकून तब्बल दोनशे गुन्हेगारांची चौकशी केली.
त्यावेळी शबऱ्या पवारसह तिघांची नावे पुढे आली. गुन्हे अन्वेषणचे पथक शबऱ्याच्या मागावर होते. मात्र, तो गुंडाविरोधी पथकाच्या हाती लागला.

Web Title: Double murder of Belunki from three gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.