चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

By Admin | Updated: July 31, 2014 00:11 IST2014-07-31T00:10:28+5:302014-07-31T00:11:51+5:30

पावसाचा जोर कायम : शिराळा तालुक्यात चार घरांची पडझड

The doors of the Chandoli dam opened | चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

चांदोली धरणाचे दरवाजे उघडले

वारणावती/कुची : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासात ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे आज, बुधवार (दि. ३0) दुपारी १ वाजता
धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.२५ मीटरने उचलण्यात आले आहेत. येथून २ हजार ३९0 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात वाढ झाली असून नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे वारणावतीचे शाखा अभियंता प्रदीप कदम यांनी केले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून चांदोलीत मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यामुळे धरण भरणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेल्या ८ दिवसात वाढलेला पाऊस आणि धरणातून पूर्ण बंद असलेला विसर्ग यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. तीन दिवसांपूर्वीच या पातळीने सांडवा पातळी ओलांडली होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा थोडा कमी होता, म्हणून दरवाजे बंद करण्यात आले होते. आज अपेक्षित पाणीपातळी झाल्याने दरवाजे उघडून २३९0 व वीज निर्मिती केंद्रातून १७७५ असा एकूण ४ हजार १६५ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला.
सकाळी ११ वाजता शाखा अभियंता प्रदीप कदम, रेवणनाथ खोत, भीमराव पाटील, रमेश सनगर, उदय गडकरी, बबन कांबळे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाण्याचे पूजन करुन ओटीभरण केले. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्गही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ६२२.00 मीटर, तर पाणीसाठा ८३४.९४९ द.ल.घ.मी. (२९.४८ टी.एम.सी.) इतका आहे. धरण ८५.७0 टक्के भरले असून आजअखेर १६८८ मि.मी. पावसाची येथे नोंद झाली आहे. कुची व परिसरात रिमझिम सुरू असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The doors of the Chandoli dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.