ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:08+5:302021-09-12T04:31:08+5:30
सांगली : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याच्या तयारीत राज्य शासन आहे. ग्रामपंचायत कर्मचारी शासकीय सेवेत असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ नकोच
सांगली : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याच्या तयारीत राज्य शासन आहे. ग्रामपंचायत कर्मचारी शासकीय सेवेत असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची गरजच नाही. महामंडळ आमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावरची लढाई करू, असा इशारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे (आयटक संलग्न) सेक्रेटरी ॲड. राहुल जाधव यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक सांगलीत झाली. यावेळी ॲड. जाधव बोलत होते. बैठकीस रमेश सहस्त्रबुध्दे, दादासाहेब झुरे, माणिक देसाई, नवनाथ मोहिते, पांडुरंग पाटील, शशिकांत चव्हाण, संतोष मुळीक, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. जाधव पुढे म्हणाले, राज्य सरकार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा प्रयत्नात आहेत. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या ग्रामपंचात कर्मचारी शासकीय कर्मचारीच असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची गरजच काय आहे? संघटनेच्या बैठकीत महामंडळ करू पाहणाऱ्या राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. तसेच दि. १० ऑगस्ट २०२० च्या नवीन आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची १० टक्के भरती त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकट
कोरोनाचे मानधन न देणाऱ्या ग्रामपंचायतीवर फौजदारी
कोरोना कालावधीत काम करून घेऊनही अनेक ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांना मानधन दिले नाही. कायदेशीर मागणी करून या ग्रामपंचायतींनी मानधन दिले नाही तर संबंधित ग्रामपंचायतींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा ॲड. जाधव यांनी दिला.