शिक्षक बँकेकडून कर्जासाठी स्टँपची सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:08+5:302021-05-19T04:26:08+5:30
सांगली : कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कर्ज प्रकरणासाठी मुद्रांकांचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे शिक्षक बँकेने ...

शिक्षक बँकेकडून कर्जासाठी स्टँपची सक्ती नको
सांगली : कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कर्ज प्रकरणासाठी मुद्रांकांचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे शिक्षक बँकेने सभासदांना कर्जासाठी मुद्रांक सक्ती करू नये, अशी मागणी बँकेचे संचालक अविनाश गुरव यांनी केली.
गुरव म्हणाले की, शिक्षक बँकेच्या कर्जावरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत ज्यादा असल्यामुळे बहुतांश सभासदांनी कर्जासाठी इतर बँकांची वाट धरलेली आहे, अशातच मुद्रांक मिळत नसल्याने सभासदांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन अथवा स्टँप ड्युटीची आगाऊ रक्कम बँकेकडे भरणा करून घेऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे. रयत सेवक बँकेप्रमाणे कर्ज रोख्यावरच स्टँप ड्युटी भरलेला शिक्का मारण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी बँकेच्या कारभाऱ्यांनी बँकेचे ऑडिटर किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. परंतु, सभासदांच्या हिताचा विसर पडलेले सत्ताधारी हे करतील, असे वाटत नाही.
सध्या शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत, आर्थिक अडचणी कधीही थांबत नाहीत, तरी कोविड कर्ज म्हणून विशेष कर्ज नऊ टक्के व्याजाने सभासदांना उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, हंबीरराव पवार, तानाजीराव खोत, शामगोंडा पाटील, सुधाकर पाटील, महादेव हेगडे, बाजीराव पाटील, शोभा पाटील उपस्थित होते.