महापालिकेत झाले ते जिल्हा परिषदेत नकाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:39+5:302021-04-01T04:27:39+5:30

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. ...

Don't do what happened in Municipal Corporation in Zilla Parishad! | महापालिकेत झाले ते जिल्हा परिषदेत नकाे!

महापालिकेत झाले ते जिल्हा परिषदेत नकाे!

सांगली : महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सत्तांतर झाले, जिल्हा परिषदेत तर मित्र पक्षांच्या टेकूवर भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा हट्ट नकोच, असे भाजपच्या बहुतांशी नेत्यांचे मत आहे. मात्र, खासदार संजयकाका पाटील यांनी बदलाची भूमिका घेतली आहे. त्यावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.

जिल्हा परिषदेत ६१ सदस्यसंख्या आहे. भाजपकडे पक्षाच्या चिन्हावर २४ आणि सहयोगी सदस्य एक असे २५ सदस्य आहेत. शिवाय रयत क्रांती आघाडीचे चार, शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर गटाचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन अशा ३४ सदस्यांचे बहुमत आहे. पण, सध्या पदाधिकारी बदल करायचा म्हटले तर बाबर, घोरपडे गट भाजपबरोबर राहतील, याची खात्री भाजपच्या नेत्यांना नाही. यामुळे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप यांचा पदाधिकारी बदलास विरोध दिसत आहे. मात्र, इच्छुकांना दिलेल्या शब्दानुसार बदल करा, अशी भूमिका खासदार पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा सुरू केली आहे. पदाधिकारी बदलावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

दोन दिवसांत नेत्यांची बैठक घेऊन निर्णय : संजयकाका पाटील

ठरल्यानुसार पदाधिकारी बदल तर करावाच लागणार आहे. त्यासाठी भाजप नेत्यांसह शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करण्यात येणार आहे. दोन दिवसांत भाजपसह मित्रपक्ष, संघटनांची बैठक घेऊन तिढा सोडविणार आहे, असे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.

चौकट

विषाची परीक्षा कशासाठी? : विलासराव जगताप

महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही सत्तांतर झाले. भाजपचे नगरसेवक फुटत असतील तर जिल्हा परिषदेचा विचार न केलेलाच बरा, असे स्पष्ट मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेत बहुमत नसताना पदाधिकारी बदलाचा निर्णय घेणे म्हणजे विषाची परीक्षा घेतल्याप्रमाणेच आहे, असे खा. पाटील यांनाही सांगितले आहे. बाबर, घोरपडे, महाडिक गटाशी चर्चा करून त्यांचा होकार मिळवा, नंतरच बदलावर निर्णय घ्या, असेही संजयकाकांना सांगितल्याचे जगताप म्हणाले.

चौकट

पक्षीय बलाबल

भाजप २५

राष्ट्रवादी १४

काँग्रेस ०९

रयत आघाडी ४

शिवसेना ३

विकास आघाडी २

अपक्ष १

स्वाभिमानी शेतकरी संघटना १

Web Title: Don't do what happened in Municipal Corporation in Zilla Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.