बेजबाबदारपणाने कोरोनाची तिसरी लाट आणू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:13+5:302021-09-06T04:30:13+5:30

सांगली : बेजबाबदारपणे वागून कोरोनाची तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरू नका, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले. आयएमएतर्फे आयोजित वेबिनारमध्ये ...

Don’t bring the third wave of corona irresponsibly | बेजबाबदारपणाने कोरोनाची तिसरी लाट आणू नका

बेजबाबदारपणाने कोरोनाची तिसरी लाट आणू नका

सांगली : बेजबाबदारपणे वागून कोरोनाची तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरू नका, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले. आयएमएतर्फे आयोजित वेबिनारमध्ये लहान मुलांना कोरोनाचा धोका तसेच पावसाळी आजार या विषयांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. वसुधा जोशी, डॉ. केतन गद्रे, डॉ. स्वप्नील मिरजकर व डॉ. अमित तगारे यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.

डॉ. गद्रे म्हणाले, व्हायरल ताप, घसादुखी, अंगदुखी, धाप ही लहानांच्या कोरोनाची काही लक्षणे आहेत. मास्कचा वापर, सतत हात धुणे व सुरक्षित अंतर हेच प्रतिबंधात्मक उपाय आहेत. कोणताही आजार अंगावर न काढता डॉक्टरांना त्वरित भेटा. कोरोनाबाधित मातेने एन ९५ मास्क घालून बाळाला स्तनपान करण्यास हरकत नाही. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढते. जंतुसंसर्गाने आतड्याला सूज येऊन अतिसार बळावतो. त्यामुळे पाणी उकळून प्या. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. कोरोना गेला या भ्रमात राहू नका.

डॉ. तगारे म्हणाले की, पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून मुलांना जपायला हवे. शरीरात वर्षभर शांत असणारे जंतू पावसाळ्यात बळावतात. अशा वेळी बालरोगतज्ज्ञ किंवा खेड्यात अंगणवाडी सेविकांचा सल्ला घ्यावा. मुलांमधील पोटदुखीही काळजी वाढवणारी असते.

डॉ. मिरजकर म्हणाले की, पौष्टिक आहाराद्वारे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवता येते. बाहेरील तयार पदार्थांपेक्षा घरातील आरोग्यदायी खाणे कधीही चांगले. डॉ. जोशी म्हणाल्या की, भरपूर पाणी पिणे, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे यामुळे मातांचे आरोग्य चांगले राहते. बाळांना अंगावर दूध पाजण्याने त्यांची प्रतिकारक्षमता वाढते. जुलाब, निमोनिया, संसर्गापासून बाळाचा बचाव होतो. स्तनपानातील अडचणींवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वेबिनारचे संयोजन आयएमएच्या अध्यक्षा डॉ. माधवी पटवर्धन व सचिव डॉ. सुहास जोशी यांनी केले.

Web Title: Don’t bring the third wave of corona irresponsibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.