दात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:15+5:302021-04-04T04:26:15+5:30
सांगली : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन घटत आहे. रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यापूर्वी संबंधितांनी रक्तदान ...

दात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे
सांगली : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन घटत आहे. रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यापूर्वी संबंधितांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयुष ब्लड हेल्पलाइन टीमचे प्रमुख अमोल पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळामध्ये रक्तसंकलनावर मोठा परिणाम झाला आहे. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून होणारे रक्तदान थांबले आहे. शिबिरांचे प्रमाणही घटले आहे. सध्या ॲनेमिया, थायलेसेमिया, सिकल सेल, कर्करोग आदी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास येत्या काही महिन्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही.
सांगली जिल्ह्यात सध्या ४५ ते ६० या वयोगटातील कोमॉर्बेडिटीच्या नागरिकांना तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण सुरू आहे. अन्य वयोगटातील लोकांसाठी अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही. त्यामुळे ज्यांचे लसीकरण अद्याप सुरू नाही, अशा तरुण वयोगटातील दात्यांनी रक्तदान मोठ्या प्रमाणावर करावे. लस घेणाऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या डोसनंतर किमान २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होता. लसीकरण सुरू असलेल्या वयोगटातील दात्यांनीही लसीकरणापूर्वी रक्तदान करावे, म्हणजे रक्तसंकलनाची परिस्थिती सुधारेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.