लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, पुन्हा दोन महिने थांबावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:32+5:302021-03-17T04:26:32+5:30
सांगली : कोरोना लसीकरणाचा वेग सध्या वाढत आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने संबंधितांना रक्तदान करता येणार नसल्याने अशा लोकांनी ...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, पुन्हा दोन महिने थांबावे लागणार
सांगली : कोरोना लसीकरणाचा वेग सध्या वाढत आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने संबंधितांना रक्तदान करता येणार नसल्याने अशा लोकांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान केल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी आतापासून शिबिरे घेऊन रक्तसंकलनासाठी तसेच लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याबाबत जनजागृतीसाठी धडपड सुरू केली आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या ४५ ते ६० या वयोगटातील कोमॉर्बेडिटीच्या नागरिकांना तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण सुरु आहे. अन्य वयोगटातील लोकांसाठी अद्याप लसीकरण सुरु झालेले नाही. तरीही सध्याचा वेग पाहता लवकरच तरुणांचेही लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. अशावेळी लस घेणाऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या डोसनंतर किमान २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होता. त्यामुळे रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
अशी आहे आकडेवारी
जणांना दररोज दिली जाते लस ७,४००
आजवर झालेले लसीकरण ७०८६२
जिल्ह्यातील एकूण रक्तपेढ्या १७
कोट
सध्या ॲनेमिया, थायलेसेमिया, सिकल सेल, कर्करोग आदी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. दहा ते १५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या आहे. कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास येत्या काही महिन्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही.
- जितेंद्र पत्की, जनसंपर्क अधिकारी, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल रक्तपेढी, मिरज
कोट
सध्या परिस्थिती बरी असली तरी उन्हाळ्यात नेहमी रक्ताची मोठी गरज भासते. कोरोना लस घेण्यापूर्वी तरुणांसह अन्य वयोगटातील दात्यांनी रक्तदान केल्यास येत्या काही महिन्यात कोणालाही रक्ताचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे रक्तदानासाठी पुढे यावे.
- डॉ. श्रुती कुलकर्णी, प्रमुख, शिरगावकर ब्लड बँक, सांगली
चौकट
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
कोरोनाच्या पहिल्या डोसनंतर २८ व दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसापर्यंत रक्तदान करता येत नाही. दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.
चौकट
कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान, तुम्हीही करा
कोरोना लसीकरणापूर्वीच मी रक्तदान केले आहे. रक्तदान केल्यानंतर लस घेण्यात कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा लसीकरणापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन मंगळवारी रक्तदान केलेल्या रक्तदात्याने केले.