एक लाख विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्ताचा दस्तावेज

By Admin | Updated: April 10, 2015 23:46 IST2015-04-10T22:58:07+5:302015-04-10T23:46:36+5:30

सांगली शिक्षण संस्थेचा उपक्रम : ‘आम्ही’ संकलनास साठ वर्षे पूर्ण; राज्यातील पहिलाच प्रयोग

Document of autobiography of one lakh students | एक लाख विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्ताचा दस्तावेज

एक लाख विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्ताचा दस्तावेज

नरेंद्र रानडे - सांगली -सांगली शिक्षण संस्थेने १९५४ पासून ‘आम्ही’ या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित ‘जीवन वृत्तांत’ संग्रहास प्रारंभ केला आहे. साहजिकच संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील भूतकाळात डोकावायची संधी उपलब्ध आहे. आजही हस्तलिखिताची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. आतापर्यंत संस्थेच्या विविध शाळांतील ग्रंथालयांमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्मवृत्तांताचा दस्तावेज सांभाळून ठेवला आहे.
‘मज आवडते ही मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा’ असे शाळेबाबत म्हटले जाते. सध्याच्या धावपळीच्या काळातही विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा उपक्रम प्रशालेच्या माध्यमातून जोपासला जात आहे. आजअखेर संस्थेच्या १३ माध्यमिक आणि १९ प्राथमिक शाळा आहेत.
यामधील चौथी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रशालेत शिकताना आलेले विविध अनुभव ‘आम्ही’मध्ये मांडले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने त्यांच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले आहे.
भविष्यात केव्हाही शालेय जीवनातील भूतकाळात डोकावून पाहायचे म्हटले तर, संबंधित प्रशालेत येऊन केवळ विशिष्ट वर्ष ग्रंथपालांना सांगितले की आपल्यासमोर त्या काळचा ‘आम्ही’चा अंक उपलब्ध आहे.
सिटी हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक भा. द. सहस्त्रबुध्दे यांना ही संकल्पना १९५४ मध्ये सुचली. तत्कालीन मुख्याध्यापक के. जी. दीक्षित यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि दि. ११ फेब्रुवारी १९५४ रोजी ‘आम्ही’च्या प्रथम अंकाची निर्मिती झाली.
पहिल्याच अंकात शिक्षक द्वा. वा. केळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत, प्रशालेने तुम्हाला दिलेली संस्काराची शिदोरी नीट बांधून घ्या, असा प्रेमाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे ‘आम्ही’ अंकामागील पार्श्वभूमीही सविस्तरपणे विशद केली आहे. ही संकल्पना पुढील काळातही संस्थेने सातत्याने राबविली आहे.
पंधरा वर्षांपूर्वीपासून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सामावून घेण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेले स्वानुभवही वाचण्यासारखे आहेत. हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून, यापासून प्रेरणा घेऊन राज्यातील अन्य काही शाळांतूनही उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे.


‘आम्ही’ हा अभिनव उपक्रम संस्थेत १९५४ पासून अव्याहतपणे राबविण्यात येत आहे. माजी विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा आवर्जून ‘आम्ही’चा अंक पाहतात. त्यातील पानांना स्पर्श करताच त्यांना एक वेगळीच अनुभूती मिळते आणि ते त्यांच्या काळात रममाण होतात. भविष्यात देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- जनार्दन लिमये
उपाध्यक्ष, सांगली शिक्षण संस्था



‘आम्ही’मध्ये आहे काय?
शाळेचा निरोप घेताना तत्कालीन विद्यार्थ्यांचे बालपणापासून दहावीपर्यंत आलेले अनुभव त्यांच्या छायाचित्रांसह त्यांच्या हस्ताक्षरात यामध्ये शब्दबध्द करण्यात आलेले आहेत. जीवनातील महत्त्वाच्या घटना तसेच भविष्यात कोण व्हायचे आहे, हे देखील विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहे. ‘आम्ही’मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरचा पत्ता लिहिलेला आहे. याचा लाभ १९५४ नंतर सुमारे तीस ते पस्तीस वर्षांनी ज्यावेळी माजी विद्यार्थ्यांचे एकत्रिकरणाचा उपक्रम प्रशालेने राबविला, त्यावेळी दिसून आला. अनेकांचे पत्ते लिखित स्वरुपात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांशी पत्ररूपाने संवाद साधण्यास मदत झाली.

Web Title: Document of autobiography of one lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.