महिलेच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना मारहाण
By Admin | Updated: October 30, 2014 01:14 IST2014-10-30T01:11:39+5:302014-10-30T01:14:47+5:30
नातेवाइकांचा गोंधळ : मिरजेत सोर्टुर रुग्णालयातील प्रकार

महिलेच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना मारहाण
मिरज : मिरजेतील सोर्टुर रुग्णालयात महिला रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांनी गोंधळ घालून ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद सोर्टुर यांना आज, बुधवारी मारहाण केली. डॉ. सोर्टुर यांच्या अटकेच्या मागणीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले.
आरग (ता. मिरज) येथील सविता लक्ष्मण देसाई (वय ३८) यांच्या छातीत दुखत असल्याने रात्री दीड वाजता सोर्टुर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. सोर्टुर यांचे सहायक
डॉ. अनिल शेळके हे देसाई यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, सविता देसाई यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाईकांनी डॉ. सोर्टुर यांना बोलावून घेण्याची विनंती केली; मात्र डॉ. सोर्टुर यांना नातेवाईकांनी दूरध्वनी केला असता, त्यांनी येण्यास नकार देऊन सहाय्यक डॉक्टर उपचार करतील, असे सांगितले.
अत्यवस्थ सविता देसाई यांचा दुपारी मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. डॉ. सोर्टुर व त्यांचे सहाय्यक डॉ. शेळके यांना मारहाण करून अतिदक्षता विभागाच्या दरवाजाची मोडतोड करण्यात आली. आरग येथील ग्रामस्थही रुग्णालयासमोर जमले.
डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष करून सहाय्यक डॉक्टर व परिचारिकेकडून उपचार केल्यामुळे सविता देसाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत उपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉ. सोर्टुर यांना अटक करावी, अशी मागणी करीत नातेवाईक व आरगचे सरपंच एस. आर. पाटील, बी. आर. पाटील, श्रीकांत पाटील, दीपक जाधव, सिकंदर मकानदार, अनिल कोरबू यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर धरणे धरले.
डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने राज्य राखीव दलाचा बंदोबस्त पाचारण करण्यात आला. डॉ. सोर्टुर यांना मारहाण झाल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील अनेक डॉक्टर सोर्टुर रुग्णालयात आले.
पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तक्रारीची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन दिले; मात्र जमावाने डॉक्टरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने डॉ. शिवानंद सोर्टुर यांना पोलीस वाहनातून तेथून हलविण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सुमारे पाच तास डॉ. सोर्टुर यांच्या रुग्णालयात गोंधळ सुरू होता.
सविता पाटील यांच्या मृत्यूबाबत पती लक्ष्मण पाटील यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी सांगितले. डॉ. सोर्टुर यांचा जबाब पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यात आला. (वार्ताहर)