एक रुपया ऊस बिल काढणाऱ्यांना सभासदांच्या पुढे जाण्याचा अधिकार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:23+5:302021-02-11T04:28:23+5:30
शिरटे : सभासदांची साखर १४ रुपये करून १ रुपयाचे ऊस बिल काढणाऱ्यांना सभासदांच्या पुढे जाण्याचा अधिकार आहे का? घरात ...

एक रुपया ऊस बिल काढणाऱ्यांना सभासदांच्या पुढे जाण्याचा अधिकार का?
शिरटे : सभासदांची साखर १४ रुपये करून १ रुपयाचे ऊस बिल काढणाऱ्यांना सभासदांच्या पुढे जाण्याचा अधिकार आहे का? घरात बसून पगार, तिप्पट दराने माल खरेदी व बारदानाविना कारखाना बंद ठेवणाऱ्यांच्या काळातील अहवाल व सध्याचा अहवाल बघा म्हणजे स्वच्छ कारभार कुणाचा, हे समजून येईल, असे मत कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता.वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्कदौऱ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक रघुनाथराव मोहिते होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक पांडुरंग होनमाने, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, दादासाहेब रसाळ, सोसायटीचे अध्यक्ष शंकर मोहिते, डॉ. सुशील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अतुल भोसले म्हणाले, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सहकार पॅनेलने ज्या-ज्यावेळी सत्ता घेतली त्यावेळी चांगले काम करून दाखविले आहे. पाच वर्षात दर बघा. उतारा, तोडणी खर्च, खरेदी खर्च असे पारदर्शकच काम केले आहे. सभासदांच्या विश्वासामुळेच डॉ. सुरेश भोसले यांचे संचालक मंडळ सत्तेत आहे.
२०१० ते २०१५ या काळात बारदान नाही म्हणून कारखाना बंद ठेवावा लागला. रस ओढ्याला जात होता. कमी दराने साखर विकली. काही लोकांना घरात बसून पगार दिला. तिप्पट दराने लागणारा माल खरेदी केला. मागील सत्तेत असणारे यांचे काळातील ताळेबंद आणि आता डॉ. सुरेश भोसले यांच्या काळातील ताळेबंद बघण्याचे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच दादासाहेब रसाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शंकर कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गोडसे यांनी आभार मानले.
यावेळी राजेंद्र पाटील, अशोक मोहिते, रोहित मोहिते, अशोकराव गोडसे, संपतराव मोहिते, आनंदराव कळसे उपस्थित होते.
फोटो ओळ -१००२२०२१-आयएसएलएम-शिरटे न्यूज
भवानीनगर (ता.वाळवा) येथे सभासद संपर्कदौऱ्यात डॉ. अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथ मोहिते, डॉ. सुशील सावंत, जगदिश जगताप, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.