आरेवाडी देवस्थान परिसरात दर्जेदार विकासकामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:41+5:302021-01-21T04:24:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवस्थानास वर्षभरात लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे आरेवाडीला ...

आरेवाडी देवस्थान परिसरात दर्जेदार विकासकामे करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवस्थानास वर्षभरात लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे आरेवाडीला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बिरोबा देवस्थान विकास आराखड्यातील सर्व कामे करावीत. निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बिरोबा देवस्थान विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील आरेवाडीचे बिरोबा देवस्थान ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असल्याने तीर्थक्षेत्र विकासांतर्गत देवस्थान आणि परिसराचा विकास आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत रस्ते, वाहनतळ, भक्त निवास व स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, दुकानगाळ्यांचे बांधकाम आदी विकासकामे सुरू असल्याने भाविकांची सोय होणार आहे. ही कामे पूर्ण करताना त्यात दर्जा कायम ठेवून आणखीही काही कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राहूल कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, दाजी कोळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.