द्राक्षांच्या डिपिंगचा खर्च परवडेना!
By Admin | Updated: February 10, 2015 23:54 IST2015-02-10T22:34:31+5:302015-02-10T23:54:47+5:30
बागायतदार मेटाकुटीला : इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्पे्रच्या नव्या पर्यायाचा वापर

द्राक्षांच्या डिपिंगचा खर्च परवडेना!
गजानन पाटील - संख -औषधांचा अपव्यय, मजुरांचा वाढता खर्च, महागडी औषधे, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. जत पूर्व भागात सध्या द्राक्षबागेत द्राक्षघड डिपिंगची कामे सुरू आहेत. डिपिंगचा खर्च मोठा आहे. आता शेतकऱ्यांनी डिपिंगला पर्याय शोधला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्प्रे (इ. एस. एस.) ही यंत्रणा बागायतदारांना सोयीची वाटू लागली आहे. कमी वेळेत अधिक फायद्याची हे यंत्र असल्याने डिपिंगसाठी वापर केला जात आहे.
तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. पूर्व भागातील तिकोंडी, संख, करजगी, भिवर्गी, कोंत्यावबोबलाद परिसरामध्ये द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिल, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतो
सध्या या द्राक्षबागेत द्राक्षघड डिपिंगची कामे सुरू झाली आहेत. डिपिंग म्हणजे द्राक्षघड जीब्रॉलिक अॅसिड (जीए) या संप्रेरकाच्या द्रावणात बुडवले जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते.
ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाले आहे. द्राक्षबागेतील मजुरीचे दर हे बागेतील एकरी द्राक्षवेलीच्या संख्येवर ठरत आहेत. यावर्षी सरासरी ४ रुपयापासून ते ७ रुपये एक झाड असा डिपिंगचा दर आहे. तसेच डिपिंगसाठी मजुरी २०० रुपये आहे. एक मजूर दिवसात २५ झाडांचे घड डिपिंग करतो.
एकरी झाडांची संख्या दोन द्राक्षवेलीतील अंतरावर ठरते. ९५० पासून १८०० पर्यंत एका एकरात द्राक्षवेली असतात. डिपिंगचा खर्च मोठा असतो. त्यावर आता द्राक्ष बागायतदारांनी पर्याय शोधला आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्प्रे. पूर्णपणे अमेरिकन बनावटीची ही यंत्रणा शेतकऱ्यांना सोयीची वाटू लागली आहे.
सध्या संख, तिकोंडी, भिवर्गी, करजगी परिसरामध्ये इ.एस.एस.चे नागठाणे (ता. वाळवा) येथील स्प्रे करणारे ट्रॅक्टर आहेत. तासगाव, पलूस तालुक्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वापर करीत आहेत. परिणामही चांगला दिसून आला आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. यावर्षी प्रथमच स्प्रेचा वापर करीत आहेत. कमी श्रमात, कमी वेळेत आणि एकाचवेळी एकसारखी जीएची फवारणी होते.
इ एस एस स्प्रे पंपाद्वारे डिपिंगचे काम लवकर, एकसारखे होते. मजुरांकडून डिपिंग करताना द्रावणात घड चुकून बुडवला जात नाही. त्याचा फटका बसतो. औषधाचीही बचत होते. कमी श्रमात काम होते. चांगले परिणाम दिसून आल्याने यावर्षी पंपाला प्रथम प्राधान्य दिले आहे.
- रामेश्वर नलवडे
द्राक्ष बागायतदार, संख
फवारणी दर एकरी अडीच हजार
इ एस एस स्प्रे करणाऱ्या एका युनिटची किंमत (ट्रॅक्टर वगळता) १६ लाख रुपये इतकी आहे. सध्या एकरी अडीच हजार रुपये इतका फवारणीचा दर आहे. या पंपाद्वारे फवारणीसाठी केवळ ३५ ते ४० लिटर द्रावण लागते. मजुरांकडून डिपिंंग करण्यासाठी ५०० लिटर पाणी लागते. एस. एस. पंपाद्वारे पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आकार ३० मायक्रॉन इतका सूक्ष्म असतो.