राजकीय द्वेषाने सहकार मोडीत काढू नका
By Admin | Updated: August 30, 2015 22:34 IST2015-08-30T22:34:32+5:302015-08-30T22:34:32+5:30
रामराजे निंबाळकर : सांगलीत वसंतराव जुगळे यांच्या सत्कारप्रसंगी प्रतिपादन

राजकीय द्वेषाने सहकार मोडीत काढू नका
सांगली : राज्यातील सहकार इतिहासजमा होत आहे. त्यावर ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांचे संसार अवलंबून आहेत. केवळ राजकीय द्वेषातून सहकार मोडीत निघाला, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघेल, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी रविवारी सांगलीत केले. सांगलीत अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रा. वसंतराव जुगळे यांचा सत्कार रामराजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, बापूसाहेब पुजारी उपस्थित होते.
प्रा. जुगळे यांची ग्रंथसंपदा थक्क करणारी आहे. त्यांचे कार्य ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारे आहे, असे सांगत निंबाळकर म्हणाले की, राज्यातील सिंचन योजना पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी पाण्याची किंमत निश्चित व्हावी, अशी अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जुगळे यांनी शिक्षण, शेती, सिंचन या सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याला शासनाचाही सलाम आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांची सुरुवात भाजप सरकारने केली आहे. पुढील पाच वर्षात २५ हजार कोटी रुपये कृषी क्षेत्रावर खर्च केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून पाणी अडविण्याचे काम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. राम शिंदे म्हणाले की, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जुगळे यांचे कार्य आदर्श आहे. ध्येयवादी व्यक्तीच क्रांती घडवू शकतात, हे जुगळे यांनी सिद्ध केले आहे. आज राज्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत आहेत. अशा काळात राज्याला जुगळे यांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे.
गणपतराव देशमुख म्हणाले की, राज्याचा कृषी दर उणे आहे. त्यासाठी सिंचनाशिवाय पर्याय नाही. टेंभू, म्हैसाळ योजना पूर्ण झाल्या पाहिजेत. सिंचनावर जुगळेंनी भरीव लेखन केले आहे. त्यांचे विचार राज्याला मार्गदर्शक ठरतील.
प्रा. जुगळे म्हणाले की, देशात कुशल कामगारांची बेकारी वाढली आहे. त्यासाठी उत्पादकता वाढविणाऱ्या गोष्टीत काम केले पाहिजे. दुष्काळालाही दिशा देण्याचे काम होताना दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्वागत केले.
यावेळी प्राचार्य आर. के. स्वामी, प्रा. सुभाष दगडे, संजय ठिगळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रामराजेंची राजकीय टोलेबाजी
कार्यक्रमात रामराजे निंबाळकर यांनी चांगलीच टोलेबाजी केली. अण्णासाहेब डांगे यांचा भाजप व राष्ट्रवादीतही दरारा होता असे सांगत, त्यांचा शब्द महाराष्ट्र ऐकतो, असे कौतुक केले. खा. संजय पाटील यांनी अजून टांग मारलेली नाही का? असा सवाल चंद्रकांतदादांकडे बघत केला. पाटील हे पैलवान आहेत. त्यांनी माझ्या तालुक्यातही पैलवान घडविले. मी कुस्तीतील टांगेबद्दल बोलतोय, दुसरा अर्थ घेऊ नका, असा टोला लगाविताच उपस्थितांत हशा पिकला.