बेशिस्तांची गय करणार नाही!
By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T23:08:36+5:302015-05-21T00:01:01+5:30
सुनील फुलारी : जिल्हा पोलीसप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला

बेशिस्तांची गय करणार नाही!
सांगली : समाजात घडणाऱ्या समाजविघातक घटनांना प्रतिबंध करणे हे पोलिसांचे कर्तव्यच असून, त्याचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न करण्यात येईल. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना नेमून दिलेले काम चोख करणे अपेक्षित आहे. बेशिस्त वर्तणूक माझ्या शिस्तीत बसत नसून, भविष्यात तसे आढळल्यास कोणाचीही गय करण्यात येणार नसल्याचे मत नूतन जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना बुधवारी व्यक्त केले.विधायक कामाच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून सांगलीकरांच्या मनावर छाप पाडणारे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बुधवारी दुपारी साडेअकराला नूतन जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्याकडे कार्यभार सोपवला. यावेळी सावंत यांनी फुलारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. फुलारी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबतची इत्यंभूत माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फुलारी म्हणाले की, येथील नागरिक कायदा पाळणारे आणि पोलिसांना सहकार्य करणारे असल्याचे मला सांगण्यात आले आहे. पुढील काळातही गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी उभारलेल्या मोहिमेस सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीविषयी माहिती घेतली असली तरी, त्याचा स्वतंत्र अभ्यास करणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिक उद्यमशील असल्याने त्यांच्याकडून मला बरेच नवीन शिकायला मिळेल, असा विश्वास आहे. जिल्ह्यातील बहुतांश गुन्हेगार सध्या जेलची हवा खात आहेत. अजून कोणते गुन्हेगार बाहेर आहेत का, याचीही माहिती घेणार आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार असून कोणत्याही प्रकारचे
खपवून घेतले जाणार नाहीत. समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे हेच पोलिसांचे काम आहे. ते कर्तव्यभावनेने बजावण्यात येईल. जिल्ह्यात काम करताना कोणाबाबतही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून व्यवहार करण्यात येणार नाही. मात्र कोणी चूक केली, तर त्याला निश्चितपणे कारवाईला सामोरे जावे लागेल.
मुख्य म्हणजे कोणतेही काम कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सुनील फुलारी यांची कारकीर्द
जन्मतारीख - २६ सप्टेंबर १९६७
शिक्षण - एम.एस्सी. (फिजिक्स), एम.बी.ए., फ्रेंच भाषा प्रमाणपत्र, डिप्लोमा इन सायबर क्राईम, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी क्राईम (मालमत्तेचे बौद्धिक गुन्हे)
पोलीस दलात रुजू- १७ जुलै १९९३
अनुभव - १. चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी २. नागपूर शहर क्राईम ब्रँच येथे सहायक पोलीस आयुक्त ३. पुणे शहर क्राईम ब्रँच येथे पोलीस उपायुक्त ४. दौंड येथे राज्य राखीव दलाचे कमांडिंग आॅफिसर ५. नाशिक शहरला पोलीस उपायुक्त, ६. नाशिक प्रशिक्षण केंद्रात पोलीसप्रमुख
पोलिसांच्या हक्कासाठीही आग्रही राहणार...
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कर्तव्य नीट बजावले तर त्यांच्यावर ताण येण्याचा प्रश्नच नाही. कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, यासाठीही मी आग्रही आहे. सुट्ट्या हव्या असतील तर अडवणुकीच्या धोरणाचा अवलंब करण्यात येणार नाही. सध्या सर्वत्र रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कित्येक अपघात वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. परिणामी अपघात रोखायचे असतील, तर वाहनधारकांनीच आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित ठेवून काळजीपूर्वक वाहन चालविणे अपेक्षित असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख फुलारी यांनी सांगितले.