आपले मन, हृदय दगड होऊ देऊ नका

By Admin | Updated: March 3, 2015 00:28 IST2015-03-02T23:47:54+5:302015-03-03T00:28:35+5:30

येडेनिपाणीमध्ये वसंतदादा व्याख्यानमाला : मकरंद गोंधळी --वसंतदादा व्याख्यानमाला

Do not let your heart, heart, be a stone | आपले मन, हृदय दगड होऊ देऊ नका

आपले मन, हृदय दगड होऊ देऊ नका

कामेरी : दगडावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे. मानवाचे दगडाशी घट्ट नाते आहे, हे जरी खरे असले तरी, आजच्या विज्ञान युगात आपले मन व हृदय दगड होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी व्यक्त केले.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जयकिसान मंडळाच्यावतीने आयोजित पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘...आणि आसूही हसले खुदूखुदू.. खदा खदा..!’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते.
मकरंद गोंधळी म्हणाले, दगडावर आपले प्रेम पूर्वीपासून आहे. त्याच्याशी आपले नाते घट्ट आहे. कारण देव, देऊळ, घर, चूल, पाटा, वरवंटा, जाते एवढेच नव्हे, तर पूर्वजांच्या स्मृती असणारे थडगेही दगडाचेच. भांडणासाठी मुलांच्या हातातही दगडच. मात्र विज्ञान युगात मन दगड होणार नाही, याची काळजी घ्या. आई, वडील, मुले, मुली यांच्यातील संभाषण वाढवा. सायंकाळचे जेवण सर्वांनी एकत्र घ्या, तरच कुटुंब संस्कारी बनेल.
माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, काँग्रेसवर आपला राग आहे. कारण जर त्यांनी वसंतदादा व यशवंतराव चव्हाण यांच्यात भांडण लावले नसते, तर देशाला दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे असता. महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान झाला असता. कारण या दोन नेत्यांनी विधायक विकासाची पाऊलवाट कशी चालावी, याची शिकवण सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिली.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, बाळासाहेब पाटील, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार, जयराज पाटील, गोविंदराव जाधव, के. डी. पाटील, हेमंत कुरळे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Do not let your heart, heart, be a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.