फक्त नियमांवर बोट नको
By Admin | Updated: October 9, 2015 21:17 IST2015-10-09T21:17:30+5:302015-10-09T21:17:30+5:30
दादा इदाते : मंडणगड तालुका दौऱ्यात जाणल्या व्यथा

फक्त नियमांवर बोट नको
मंडणगड : भटक्या व विमुक्त जातींचे प्रश्न कायदा व नियमांवर बोट ठेवून सुटणार नाहीत. त्यासाठी करूणा व तळमळ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भटक्या व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा ईदाते यांनी मंडणगड येथे ‘लोकमत’शी बोलताना केले.मंडणगड तालुका दौऱ्यावर ते आले असता त्यांनी तालुक्यातील बंजारा व वंजारी लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़ तसेच तालुक्यातील नागरिकांशीही संवाद साधला़ यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी देशातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जातींच्या लोकांना जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला या दोन मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.़ भटक्या व विमुक्त जातीमधील लोक उदरनिर्वाहासाठी गावोगावी वाडी वस्त्यांवर फिरत असल्याने त्यांच्या रहिवासी असल्याचे अनेक ठिकाणी पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ यामुळे अशा लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही़ यासाठी केवळ कायदा व नियमांवर बोट ठेवून काम केल्यास अशा लोकांचे प्रश्न कधीच सुटू शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.यावेळी मंडणगड तालुका बंजारा समाज सेवा संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. तालुक्यात सुमारे ७०हून अधिक कुटुंब मोलमजुरी करून जीवन जगतात, त्यांना राहण्यास स्वत:ची हक्काची जागा नाही, याचबरोबर या समाजातील मुलांना शिक्षणासाठी आवश्यक जातीचा, उत्पन्नाचा, रहिवासाचे दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने व दाखले न मिळाल्याने ही मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यावर इदाते यांनी अशा भटक्या विमुक्त समाजासाठी शासनाच्या तांडावस्ती विकास योजनेंतर्गत जागा मिळवून देणे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरांची मागणी करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी मंडणगड - दापोली खेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय कदम, अजय बिरवटकर यांनी दादा इदाते यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दादा इदाते यांच्याकडून समाजाच्या असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावर चर्चादेखील केली. (प्रतिनिधी)
दौरा : बंजारा व वंजारी लोकांशी संवाद
भटक्या व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी नुकताच मंडणगड येथे दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या. बंजारा व वंजारी लोकांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
अनेक अडचणी
बंजारा व वंजारी समाजातील अधिकतर कुटुंब मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहेत. त्यांना विविध दाखल्यांची अडचण भासत आहे.