जुन्या नोटांचा हप्ता नको!
By Admin | Updated: November 13, 2016 23:55 IST2016-11-13T23:55:39+5:302016-11-13T23:55:39+5:30
फायनान्स कंपन्या : बचत गटातील महिलांना दमदाटी

जुन्या नोटांचा हप्ता नको!
सांगली : कर्जाचा हप्ता देताना पाचशेच्या व हजारच्या नोटा घेणार नाही. ‘दहा मिनिटात येणार आहे, सर्व महिलांनी शंभराच्या नोटा घेऊन हप्त्याची तयारी करा’, अशी दमदाटी फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण बचत गटातील महिलांना केली जात आहे. गटातील महिलांकडे हजार, पाचशेच्या नोटा असल्याने आता करायचे काय? असा त्यांना प्रश्न पडला आहे. फायनान्स कंपन्यांच्या दमदाटीमुळे महिलांकडून पोलिस ठाण्यात धाव घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागात शिरकाव करून बचत गटातील महिलांना कर्ज पुरवठा सुरू केला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. पंधरा ते वीस महिलांना जमा करून ते गट स्थापन करतात. त्यानंतर दहा हजारापासून ते पन्नास हजारपर्यंत त्यांना कर्ज पुरवठा केला जात आहे. आठवड्यातून एकदा कंपन्यांचे प्रतिनिधी संबंधित गावात जाऊन हप्ता वसूल करतात, पण गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातली. नोटा बदलण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत दिली आहे. असे असताना फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी ग्रामीण भागातील केलेल्या कर्ज पुरवठ्याचा हप्त्यासाठी जुन्या नोटा स्वीकारणार नाही, असे सांगत आहेत. या कंपन्यांचे बँकांबरोबर व्यवहार आहेत. गटाकडून घेतलेल्या हप्त्याची रक्कम ते बँकेत जमा करू शकतात. पण त्यांनी गटात महिलांना दमदाटी सुरू केली आहे. हप्त्याची रक्कम देताना शंभराच्या नोटा पाहिजेत, असा त्यांनी पवित्रा घेतला आहे.
नोटा बंदी झाल्यापासून शहरातील नागरिकांकडे अजूनही नवीन नोटा आल्या नाहीत. शंभराच्या नोटाचे चलन फिरत नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागात तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. असे असताना बचत गटाच्या महिलांकडे शंभराच्या नोटा कुठल्या येणार? हप्ता चुकला, तर कंपन्यांकडून त्यांना दंड केला जातो. जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने आता करायचे काय? असा महिलांना प्रश्न पडला आहे. जुन्या नोटांवरून त्यांना कंपन्यांच्या प्रतिनिधींशी वाद होत आहे. (प्रतिनिधी)
नवीन नोटा आणायच्या कुठून?
फायनान्स कंपन्या पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास तयार नाहीत. शंभर रूपयांच्या नोटांचा सध्या तीव्र तुटवडा आहे. वेळेत पैसे न भरल्यास कंपन्यांकडून दंडाची आकारणी केली जाते. या कोंडीमुळे महिलांना नाहक आर्थिक भुर्दंड होत आहे.
अडवणूक : पोलिसांत जाणार?
हजार, पाचशेच्या नोटा फायनान्स कंपन्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन महिलांना दमदाटी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बचत गटातील महिला पोलिस ठाण्यात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नवीन नोटा बाजारात येईपर्यंत कंपन्यांनी जुन्या नोटा घेतल्या पाहिजेत, असे महिलांचे म्हणणे आहे.