पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:46+5:302021-05-22T04:24:46+5:30

मोबाइल सेवा सुरळीत करण्याची मागणी सांगली : शिराळा, जत तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट ...

Do cleaning work before the rains | पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे करा

पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे करा

मोबाइल सेवा सुरळीत करण्याची मागणी

सांगली : शिराळा, जत तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. विस्कळीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशांक दामोशन यांनी केली आहे.

रस्ते डांबरीकरणाविना

सांगली : आटपाडी, जत, मिरज तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. अनेक गावांमधील गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी झालेल्या पावसात अनेक रस्ते खचून गेले आहेत. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या

सांगली : जिल्ह्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालविण्यासाठी ठिकठिकाणी केबल अंथरण्यात आली होती. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

भत्त्यात वाढ, ग्रामसेवकांना दिलासा

सांगली : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता दीड हजार रुपये प्रवास भत्ता मिळणार असल्याने ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर घटला

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, मृत्यूचे प्रमाणही चांगलेच वाढलेले आहे. मागील आठवड्यात जास्त मृत्यू झाले होते; परंतु आता हे प्रमाण कमी होत आहे.

बँकांमध्ये वाढतोय कोरोनाचा धाेका

सांगली : कोरोना वाढत असतानाही बँकांमधील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. पेन्शनसह पीक कर्जासाठी बँकांमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे.

अंगणवाडीमध्ये आरोग्य तपासणी

सांगली : बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडींमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.

पशुधनास वेळेवर उपचार मिळणे कठीण

सांगली : जिल्ह्यात अनेक पशुधन विभागातील अधिकारी व कर्मचारी गैरहजर आहेत. कोरोनामुळे कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. परिणामी पशुधनास वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.

कार्डधारकांकडून नियमित स्वस्त धान्य उचलतात

सांगली : सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्डधारक नियमित स्वस्त धान्य उचलतात. त्यामुळे उर्वरित कार्डधारकांच्या ठिकाणी गरजवंतांना त्यात समाविष्ट करण्यात येत आहे.

उपनगरात रस्त्यावर अंधार

सांगली : शहरातील प्रमुख मार्गांवर रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने अंधार असतो. स्फूर्ती चौक ते हसनीआश्रम या रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या रस्त्यावरही रात्रीच्या वेळी अंधार असतो.

टीबी, एचआयव्ही रुग्णांची तपासणी

सांगली : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टीबी आणि एचआयव्ही रुग्णांचीही कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.

विवाह सोहळ्यावर नजर

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळे बेकायदेशीररीत्या पार पडणार नाहीत याची दक्षता शहरी भागात महापालिका आयुक्त, ग्रामीण भागात संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

सांगली : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत आहे. यातून शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे.

कृषी केंद्रे दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी

सांगली : कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यात कृषीसह सर्वच दुकानांवर बंधने घालण्यात आली आहेत. खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने बियाणे-खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. कृषी दुकाने सुरू ठेवण्याला वेळेचे बंधन असल्याने शेतकऱ्यांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन होत असून, कृषी दुकाने दिवसभर सुरू ठेवावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Do cleaning work before the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.