साहेबांच्या बदलीनंतर विटा पोलीस ठाण्यात दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:31+5:302021-03-24T04:25:31+5:30
विटा : प्रशासकीय सेवेतील एखाद्या अधिकाऱ्यांची बदली झाली, तर त्या अधिकाऱ्यांबाबतच्या चांगल्या-वाईट अनुभवाची नागरिकांसह कर्मचाऱ्यांत केवळ दबक्या आवाजात चर्चा ...

साहेबांच्या बदलीनंतर विटा पोलीस ठाण्यात दिवाळी
विटा : प्रशासकीय सेवेतील एखाद्या अधिकाऱ्यांची बदली झाली, तर त्या अधिकाऱ्यांबाबतच्या चांगल्या-वाईट अनुभवाची नागरिकांसह कर्मचाऱ्यांत केवळ दबक्या आवाजात चर्चा होत असते. परंतु, विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आजपर्यंतच्या इतिहासातील या पहिल्याच घटनेने नागरिकही अचंबित झाले.
विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दि. १५ फेब्रुवारी २०१९ ला पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कर्मचाऱ्यांवर दबदबा असणारे अधिकारी म्हणून ते परिचित होते. अवैध व्यावसायिकांना त्यांच्यामुळे चांगलाच चाप बसला होता. राजकीय दबाब झुगारून काम करण्याच्या त्यांच्या पध्दतीमुळे ते विटा शहरासह तालुक्यात चांगलेच लोकप्रिय झाले होते.
विटा पोलीस ठाण्यातील त्यांच्या दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांची बदली झाली. त्यांच्या रिक्त जागेवर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मंगळवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मंगळवारी सायंकाळी तत्कालीन पोलीस निरीक्षक शेळके यांचा निरोप, तर नवे पोलीस निरीक्षक डोके यांचा स्वागताचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम धूमधडाक्यात करण्यासाठी अवघ्या पंधरा मिनिटात पोलीस ठाण्यात फटाके आले. हा कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस निरीक्षक शेळके यांना मिरवणुकीच्या जीपमधून पोलीस ठाण्यातून बाहेर रस्त्यापर्यंत आणून त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात अक्षरश: दिवाळीसारखी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे कर्तव्यदक्ष साहेबांच्या बदलीचा तेथील कर्मचाऱ्यांना आनंद झाला काय, याबाबत नागरिकांत चर्चेला ऊत आला. एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला निरोप देताना फटाक्यांची आतषबाजी करणे म्हणजे अनेकांना आनंदाच्या 'उकळ्या' फुटल्याचे द्योतक असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.
फोटो - २३०३२०२१-विटा-रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक.