दिव्यांग रूपालीला २७ वर्षांनी मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:40+5:302020-12-05T05:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : जन्मताच ७६ टक्के अपंगत्व असताना दुर्धर आजाराने तिचे आधारकार्ड निघत नव्हते. त्यामुळे दिव्यांग रूपाली ...

दिव्यांग रूपालीला २७ वर्षांनी मिळाला न्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : जन्मताच ७६ टक्के अपंगत्व असताना दुर्धर आजाराने तिचे आधारकार्ड निघत नव्हते. त्यामुळे दिव्यांग रूपाली ‘आधार’विना शासकीय योजनांपासून गेली २७ वर्षे वंचित होती. याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार गणेश शिंदे, शिक्षक महादेव देसाई, अब्बास मुरसल यांच्या प्रयत्नामुळे जागतिक अपंग दिनी रूपालीचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता प्रतीक्षा आधारकार्ड येण्याची आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन तास लागले.
रूपालीचे मूळ गाव मसूद माले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे असून तिचे वडील भगवान सोळशे हे ४५ वर्षांपासून मामाच्या गावी म्हणजे पाडळी येथे आश्रयास आले आहेत. रुपाली सोळसे ही जन्मत:च गतीमंद आहे. तिची उंची दोन फूट आहे. अनेक ठिकाणी फिरूनही तिचे आधारकार्ड काढून मिळाले नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही सवलती मिळाल्या नाहीत. मतदार यादीत नाव आहे, मात्र ओळखपत्र नसल्याने तिला मतदान करता आले नाही. गुरुवारी, दि. ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनादिवशी तहसीलदार गणेश शिंदे, सलवा मुल्ला, परवीन नालबंद, सरपंच सत्यवान पाटील, जिल्हा समन्वयक संदीप पाटील यांच्या प्रयत्नाने या प्रक्रियेस यश आले. डोळ्यांच्या, हातांच्या स्कॅनिंगसाठी दोन तास लागले. रूपालीच्या डोळ्यांचे व हातांचे स्कॅनिंग करण्यासाठी पाच-सहा जणांना खूपच कष्ट घ्यावे लागले. ज्यावेळी ही प्रक्रिया पूर्ण झाली, त्यावेळी रूपालीच्या आई- वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी मदत करणाऱ्यांचा महादेव देसाई यांनी फुले देऊन सत्कार केला.
चौकट
‘लोकमत’मुळे न्याय
आम्ही आधारकार्ड काढण्यासाठी खूप ठिकाणी हेलपाटे घातले. माझ्या मुलीचे हातांचे ठसे येतात, मात्र डोळ्यांचे फोटो काढताना तिचे डोळे बंद होतात. त्यामुळे तिचे आधारकार्ड निघाले नाही. प्रयत्न करून थकलो होतो. मात्र आज ‘लोकमत’ आणि महादेव देसाई, शासकीय अधिकारी यांच्यामुळे आधारकार्डचे काम झाले. खूप आनंद झाला आहे, असे मत भगवान व सुनीता सोळसे यांनी व्यक्त केले. तसेच शिराळा तालुक्यात दोन आधार केंद्रे मंजूर झाली आहेत.