कसबेडिग्रज : उसाची एफआरपीप्रमाणे बिले देण्यास दिलेल्या शासकीय रकमेतून सर्वोदय कारखान्याने प्रतिटन १४७ रुपयेप्रमाणे ठेव कपात संमतीविना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केली आहे. ती रक्कम तात्काळ परत मिळावी, यासाठी कसबे डिग्रजमधील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना शनिवारी घेराव घातला. याप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.सध्या सर्वोदय सहकारी साखर कारखाना राजारामबापू साखर कारखाना व्यवस्थापनाकडे आहे. कसबे डिग्रजमधील अनेक शेतकऱ्यांचा ऊस सर्वोदय कारखान्यास गत हंगामात गेला होता. त्यांना अद्यापही शासकीय नियमाप्रमाणे एफआरपी मिळाली नाही. मात्र सभासद नसताना त्याचप्रमाणे काहींच्या संमतीविना साखर कारखान्याने प्रतिटन १४७ रुपयेप्रमाणे कपात केली आहे. ही रक्कम सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या देय बिलातून वसूल केली गेली आहे. या १४७ रुपये ठेव कपातीस गावातील शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. पण याबाबत शेतकरी वर्ग, जिल्हा बँकेशी वारंवार मागणी करुन बिले जमा करीत नाही. त्यामुळे शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. याबाबत बँक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे सोमवार, ९ नोव्हेंबरला याप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कसबे डिग्रजच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शाखा अधिकाऱ्यांना दिला. (वार्ताहर)
जिल्हा बॅँक शाखाधिकाऱ्यांना कसबे डिग्रजमध्ये घेराव
By admin | Updated: November 7, 2015 23:46 IST