जिल्ह्यास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले
By Admin | Updated: June 6, 2015 00:54 IST2015-06-05T23:46:37+5:302015-06-06T00:54:55+5:30
शेतकऱ्यांत समाधान : ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित, शेतांमध्ये साचले पाणी, घरांवरील पत्रे उडाल्याने साहित्याचे नुकसान

जिल्ह्यास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले
सांगली : गुरुवारी रात्री उशिरा व शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पाऊस झाला. सांगली शहरासह वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्याने अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला होता. कुंडल, दुधोंडी येथील काही नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे १ तास पाऊस पडत होता. यामुळे शहर व परिसरातील नाले पाण्याने स्वच्छ धुऊन निघाले. सखल भागात पाणी तसेच साचून राहिले होते. कुरळप, कामेरी, पेठ, इटकरे, येलूर, तांदुळवाडी, नेर्ले, कासेगाव, वाळवा, बहे, भवानीनगर, बिचूद, रेठरेहरणाक्ष, ताकारी, शिरटे, येडेमच्छिंद्र येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली.
गोटखिंडी : गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने गोटखिंडी, बावची परिसराला झोडपून काढले. दोन तास झालेल्या पावसाने वीजपुरवठाही खंडित झाला होता.
कडेगाव : कडेगाव तालुक्यात गुरुवारी रात्री कडेगाव, वांगी, कडेपूर, चिंचणी, देवराष्ट्रे परिसराला रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होता, तर कडेगाव, शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कडेगाव बाजारामध्ये विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली.
देवराष्ट्रे : गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास अंबक, आसद, मोहिते वडगाव, चिंचणी, पाडळी, वाजेगाव, सोनकिरे, शिरसगाव या भागात प्रथमच दमदार हजेरी लावली. शेतातील पिकांसह केळी, डाळिंब व भाजीपाला यांची प्रचंड हानी झाली आहे.
वांगी : शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून तालुक्यातील देवराष्ट्रे, वांगी, कडेगाव, शाळगाव, नेवरी परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दमदार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून शेतातील ताली भरल्या आहेत. पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता
पलूस : पलूस शहर आणि परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस रात्रभर संततधार सुरू होता. रात्री ९ नंतर पावसाने झोडपून काढले.
कवठेमहांकाळ : वादळी वारा आणि पावसाने कवठेमहांकाळ तालुक्याला गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले. अनेक गावातील ओढ्यांना पाणी आले आहे. कवठेमहांकाळ, कुची, ढालगाव, रांजणी, हिंगणगाव, जाधववाडी, झुरेवाडी, खरशिंग, बोरगाव, मळणगाव, कोंगनोळी, करोली परिसरात पाऊस झाला.
देशिंग : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गारांचा वर्षाव झाला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सोळा तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
कुंडल : कुंडल परिसरात गुरुवारी रात्री ११ च्या दरम्यान जोरदार वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. कराड-तासगाव रस्त्यावर माळी वस्ती ते घाडगे पूलदरम्यान झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
भाळवणी : भाळवणी, कळंबी, ढवळेश्वर, शेळकबाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले व पडझड झाली. विटा, पारे, बामणी, चिंचणी (मं), आळसंद या परिसरात जोरदार पाऊस पडला.
शिराळा : शिराळ्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारासही चांदोली, कोकरूड, चरण, आरळा, मांगले, शिरसी, वाकुर्डे, अंत्री खुर्द येथे दमदार पाऊस झाला.
सागाव : शिराळा तालुक्यातील सागाव, कणदूर, पुणवत, नाटोली, कांदे परिसरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी सहानंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. (वार्ताहर)