गणेश मोरे, दीपक माने, प्राजक्ता पवार, पूजा फडोळ यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:38+5:302021-02-05T07:32:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने २०२०-२०२१ चे क्रीडा पुरस्कार सोमवारी जाहीर केले. कवठेपिरान येथील दीपक सुरेश ...

गणेश मोरे, दीपक माने, प्राजक्ता पवार, पूजा फडोळ यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने २०२०-२०२१ चे क्रीडा पुरस्कार सोमवारी जाहीर केले. कवठेपिरान येथील दीपक सुरेश माने आणि वाळवा येथील प्राजक्ता प्रकाश पवार या खो-खो खेळाडूंची गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली.
ॲथलेटिक्समध्ये पूजा संजय फडोळ व दिव्यांग खेळाडूमध्ये मोरगाव (ता. कवठेमहांकाळ ) येथील अलका वसंत आटपाडकर यांची निवड झाली. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून इस्लामपूर येथील कबड्डी प्रशिक्षक गणेश आनंदराव मोरे यांना पुरस्कार देण्यात येईल. पॅरा बॅटमिंटनपटू सुकांत इंदुकांत कदम यांचीही गुणवंत खेळाडू म्हणून निवड झाली. रोख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.
प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी व पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी ही माहिती दिली.
चौकट
गणेश मोरेला पुरस्काराने इस्लामपूरात आनंद
पुरस्कारप्राप्त गणेश मोरे हा इस्लामपूर व्यायाम मंडळाचा खेळाडू आहे. नव्वदीच्या दशकात राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याने नाव कमविले होते. त्याच्या पल्लेदार चढाया प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवायच्या. वेगवान चढाईतील चपळता प्रतिस्पर्ध्याला अचूकपणे बाद करायची. सध्या क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहे.
----------
------------