जिल्ह्यास परतीच्या पावसाचा तडाखा
By Admin | Updated: October 26, 2014 23:23 IST2014-10-26T22:27:05+5:302014-10-26T23:23:54+5:30
दोन दिवसांपासून वातावरणात बदल : रिमझिम, मध्यम पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यास परतीच्या पावसाचा तडाखा
सांगली : जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये शनिवारपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भुईमूग, सोयाबीन या पिकांना मोठा धोका उत्पन्न झाला आहे. कापणीस आलेल्या भात पिकाचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात रब्बी पिकांनाही धोका उत्पन्न झाला आहे. उसाची वाढही खुंटली आहे.
शिराळा : शिराळा तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेली भुईमूग, भात, सोयाबीन, खरीप पिके धोक्यात आली आहेत. शाळू, कडधान्ये, गहू पिकास मात्र हा पाऊस उपयुक्त ठरत आहे.
दि. २५ रोजी रात्रीपासून या पावसाने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप पिके चांगली आहेत. वेळेत पाऊस सुरू झाल्याने भार पेरणी वेळेत झाली. मात्र काल रात्रीपासून रात्रभर पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. दसऱ्यापासून भात आदी पिकांची कापणी चालू झाली आहे. कापणी केलेली पिके वाळविणे अवघड झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा फुटून सोयाबीन रानात पडले, तर भुईमूग शेंगाला कोंब फुटू लागले आहेत.
गेली काही दिवस ढगाळ वातावरण आहे. यामुळे पिके वाळविणे अवघड झाले होते. त्यातच दि. २५ रोजी रात्रभर पावसाने हजेरी लावल्यामुळे हातातोंडाशी आलेली भुईमूग, भात, सोयाबीन आदी पिके वाया जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
हा पाऊस शाळू, कडधान्ये यांना मात्र उपयुक्त ठरत आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात मांगले परिसरात सर्वात जास्त म्हणजे ३८ मि. मि. पाऊस झाला आहे. याचबरोबर शिराळा ७ मि. मि., शिरशी ५ मि. मि., कोकरूड ५ मि. मि., चरण ७ मि. मि., सागाव ९ मि. मि., चांदोली धरण परिसर १५ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.
जत : जत शहर आणि संपूर्ण तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी रात्री अधुनमधुन तुरळक प्रमाणात पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांसाठी उपयुक्त असला तरी, द्राक्ष पिकासाठी हानीकारक आहे.
मागील दीड महिन्यापासून जत परिसरात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला होता. दिवसभर कडक ऊन आणि रात्री हवेत उकाडा जाणवत होता. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. शनिवारी रात्री पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील चारा व पाणी टंचाई कमी होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.
कवठेएकंद : कवठेएकंद, कुमठे, नागाव-कवठे, उपळावी (ता. तासगाव) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे द्राक्षासह खरिपातील ऊस, भूईमूग, सोयाबीन, धने यासह कडधान्ये मूग, चवळी, उडीद अशी पिके पावसाच्या संततधारेमुळे वाया गेली, तर रब्बी पिकांनाही ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. रब्बीतील शाळू, हरभरा, गहू अशा पेरणीसाठी राखीव ठेवलेल्या शेतामध्ये पावसामुळे तणांचे साम्राज्य आहे, तर पावसाची उघडीप नसल्याने तण काढणे मुश्किलीचे बनले आहे. वाफसा नसल्याने हंगाम पुढे जात आहे. त्यामुळे खरीप फेल, तर रब्बी हंगामही फोल जाण्याची भीती आहे. मूळकुजीमुळे उसाची वाढ खुंटली जाऊन उत्पन्न घटीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडल्याने शेतीवर प्रामुख्याने परिणाम होत आहे. ज्येष्ठ शेतकरी वर्गातून बदलत्या ऋतुमानामुळे अतिशय चिंतेत आहे. पावसाची संततधार, अतिवृष्टी, कडक उन्हाळा, हुडहुडी भरवणारी थंडी अशा चित्रविचित्र हवामानातील बदलाची ग्रामीण भागात चर्चा होत आहे.
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणातील प्रचंड उष्णतामानानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून सूर्यनारायणाचेही दर्शन झालेले नाही. सततच्या या दोन दिवसाच्या लहरी पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.
भाऊबिजेदिवशी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने बहिणीच्या भेटीसाठी आतूर झालेल्या भाऊरायांची मोठी तारांबळ उडाली होती. मात्र वर्षातून एकदाच येणारा हा आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी अनेकांनी भर पावसातच आपली रपेट केली.
या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, भात अशा पिकांच्या काढणीवरही परिणाम झाला असून, ही पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा पिकांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
कवठेमहांकाळ : शनिवारपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरण, हवेतील गारवा, कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने संकरित ज्वारी काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर मळणीसाठी काढून टाकलेल्या मक्याचेही नुकसान होणार आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. (वार्ताहर)
खरिपाची पिके धोक्यात
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली भुईमूग, भात, सोयाबीन, खरीप पिके धोक्यात आली आहेत. दसऱ्यापासून भात आदी पिकांची कापणी चालू झाली आहे. कापणी केलेली पिके वाळविणे अवघड झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा फुटून सोयाबीन रानात पडले, तर भुईमूग शेंगाला कोंब फुटू लागले आहेत. गेली काही दिवस ढगाळ वातावरण आहे. रब्बी पिकांनाही ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. रब्बीतील शाळू, हरभरा, गहू अशा पेरणीसाठी राखीव ठेवलेल्या शेतामध्ये पावसामुळे तणांचे साम्राज्य आहे. त्यामुळे या पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मूळकुजीमुळे उसाची वाढ खुंटली जाऊन उत्पन्न घटीचा धोका निर्माण झाला आहे.